Ladki Bahin Yojana
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : ‘ई-केवायसी’ करुनही सोलापूर जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना डिसेंबरचे १५०० रुपये मिळाले नाहीत. ३१ डिसेंबरच्या मुदतीत महिलांनी घाईत ई-केवायसी केली. त्यावेळी तुम्ही किंवा कुटुंबातील कोणी शासकीय नोकरदार आहे का? या प्रश्नासमोरील ‘हो’ पर्यायावर लाडक्या बहिणींनी क्लिक केले. त्यामुळे त्यांना डिसेंबरचा लाभ मिळाला नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे आता त्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी होईल. त्यानंतर त्यांच्यासाठी ‘ई-केवायसी’त दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांचाच लाभ सुरु राहणार आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’ करायला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण, राज्यातील २५ लाखांहून अधिक महिला मुदतीत ई-केवायसी करु शकले नाहीत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे सव्वालाख महिला आहेत. दुसरीकडे ‘ई-केवायसी’ करुनही हजारो लाडक्या बहिणींना डिसेंबरचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे महिला आक्रमक होताच, त्याच्या कारणांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी हजारो महिलांनी शासकीय नोकरदार असल्याचा पर्याय निवडल्याची बाब समोर आली. आता त्याची वस्तुस्थिती पडताळून त्या महिलांना एक महिन्यात ‘ई-केवायसी’त दुरुस्तीची संधी दिली जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
ई-केवायसीत चुका झाल्याने मिळाला नाही लाभ
ई-केवायसी करताना महिलांनी शासकीय नोकरदार असल्याचा पर्याय निवडल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. आता शासन स्तरावरुन चूक दुरुस्तीची संधी मिळणार आहे. त्यासंदर्भातील निर्णय लवकरच होईल. चूक दुरुस्तीनंतर पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना लाभ सुरु होईल. ई-केवायसी करायचे राहिलेल्या महिलांची संख्याही खूप असून त्यांच्यासाठीही आचारसंहिता संपल्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो.
- वैशाली भोसले, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर
शेकडो महिलांचे अधिकाऱ्यांकडे हेलपाटे
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अडचणींसंदर्भात गुरुवारी (ता. २२) सचिवांनी बोलावलेली बैठक उद्या (शुक्रवारी) होईल, असे सूत्रांनी सांगितले. ‘ई-केवायसी’ करायची राहिल्याने मुदतवाढ मिळावी आणि डिसेंबरचा लाभ का मिळाला नाही म्हणून शेकडो महिला दररोज तालुका व जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या बैठकीत त्यावर मार्ग काढला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्याची स्थिती
एकूण लाभार्थी
११,२०,५६४
सध्याचे अंदाजे लाभार्थी
९.१३ लाख
ई-केवायसी न केलेले
९७,४००
डिसेंबरचा लाभ न मिळालेले
अंदाजे ७०,०००