तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील रस्त्यांवरून ये-जा करताना वाहतूक नियम मोडणाऱ्या १२ हजार २६८ वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ७८० जणांनी ३ डिसेंबरपर्यंत साडेआठ लाखांचा दंड भरला आहे. पण, दंड होऊनही तीन महिन्यांत तो न भरलेल्या चार हजार ३१८ वाहनचालकांना वॉरंट व समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना १३ डिसेंबरच्या लोकअदालतीत सहभाग घेऊन तो दंड भरावाच लागणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यांचा दंड माफ करण्याची कोठेही तरतूद नाही. कोर्टात ज्या वाहनधारकांवर खटले दाखल आहेत, त्यांच्या दंडाच्या बाबतीत लोकअदालतीत विचारविनिमय होतो. मात्र, सोशल मीडियातून काहीजण चुकीचा मेसेज पसरवून संभ्रम निर्माण करत आहेत. ज्या वाहनचालकास वाहतूक नियम मोडल्याने दंड झाला, तो कधी ना कधी भरावाच लागेल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, चुकीचा दंड पडल्याची कोणाची तक्रार असल्यास ते वाहनधारक शहरातील वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार करू शकतात. त्याठिकाणी त्याची शहानिशा करून चुकीचा दंड पूर्णतः माफ केला जातो, असेही पोलिस अधिकारी म्हणाले.
सोलापूर शहर वाहतूक शाखेची कारवाई
एकूण दाखल खटले
१२,२६८
वाहनचालकांना वॉरंट
९२५
दंड न भरल्याने समन्स
३,३९३
दंडाची अंदाजे रक्कम
५२ लाख रुपये
दंड भरावाच लागेल
वाहतूक नियम मोडल्याने वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होते. त्याने दंडाची रक्कम तीन महिन्यात नाही भरली तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले पाठविले जातात. त्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून त्या वाहनचालकांना समन्स निघतात. तरीपण, दंड भरल्यास त्यांना वॉरंट काढले जाते. त्यावेळी त्या वाहनचालकांना कोर्टासमोर उभे केले जाते. पण, लोकअदालत किंवा इतरवेळी वाहनधारक त्याचा दंड सोलापूरसह राज्यभरातील कोणत्याही वाहतूक पोलिसांकडील मशीनद्वारे भरू शकतो.
- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
मोबाईल टॉकिंग कराल तर गाडीच विकावी लागेल...
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर आरटीओ, शहर वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस, इंटरसेप्टर वाहने, अशा वेगवेगळ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होते. अनेकांच्या वाहनावर गाडीच्या किमतीपेक्षा जास्त दंड झाल्याची उदाहरणे आहेत. दरम्यान, मोबाईल टॉकिंगसाठी पहिल्यांदा एक हजार रुपये दंड आहे. त्यानंतर तो दंड न भरता पुन्हा तीच चूक केल्यास थेट दहा हजार रुपयांचा दंड आपोआप पडतो. तीन-चारवेळा अशी कारवाई झाल्यास दंड भरण्यासाठी त्या वाहनधारकास त्याची गाडी विकावी लागू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.