kerosene
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सध्या शहरातील कुटुंबांना गॅस सिलिंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची तर ग्रामीणमधील कुटुंबांना ४५ दिवसांची मर्यादा घालण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना रॉकेल दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी अंत्योदय व प्राधान्यक्रमातील असल्याची माहिती शासनाला कळविली आहे.
सोलापूर शहर-जिल्ह्यातील हजारो कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन आहेत. अनेकांनी आपल्या कनेक्शनवर वेगवेगळ्या कंपन्यांचे गॅस सिलिंडर घरात आणून ठेवले आहेत. दुसरीकडे गॅस सिलिंडरची मागणी वाढली आहे, पण त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बुकिंग करण्याचे दिवस वाढवावे लागले आहेत. एकाच घरात राहणाऱ्या अनेक कुटुंबाकडे किमान गॅस दोन कंपन्यांंचे कनेक्शन आहेत. त्यांनी भविष्यात चिंता नको म्हणून दोन्हीकडे बुकिंग करून सिलिंडर मिळविले आहे.
अशा स्थितीत अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांची परवड होऊ नये म्हणून त्यांना रॉकेल दिले जाणार आहे. राज्य शासनाने तसा निर्णय जाहीर केला पण तो कागदावर आलेला नाही. त्यामुळे या कुटुंबांना रॉकेलसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्याची पाठविली माहिती, पण...
गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून अंत्योदय व प्राधान्यक्रमाच्या लाभार्थींना रॉकेल मिळणार आहे. पण, त्यासंदर्भातील शासन आदेश किंवा लिखित कोणताही निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाही. तूर्तास, शासन स्तरावरून मागविलेली लाभार्थींची माहिती पाठविण्यात आली आहे.
- संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर
प्रति व्यक्ती रॉकेल एक लिटर
इराण-इस्राईल युद्ध अजूनही सुरूच असल्याने गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना रॉकेल दिले जाणार आहे. प्रतिव्यक्ती अंदाजे एक लिटर रॉकेल मिळू शकते, असे अधिकारी सांगतात. मार्चअखेर रॉकेल पुरवठा होऊन लाभार्थींना वितरित होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.