कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आपण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असल्याचे संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी जाहीर करून सत्तारूढ गटाच्या नेत्यांना शह दिला असला, तरी या निवडणुकीत श्री. मुश्रीफ कोणासोबत असणार, असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राला पडला आहे.
‘गोकुळ’च्या गेल्या निवडणुकीत कागलच्या राजकारणातील राजकीय अडचण सांगत श्री. मुश्रीफ यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विरोधी गटाला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता, तरीही त्यांच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. यावरून श्री. मुश्रीफ यांची ताकद स्पष्ट झाली होती. यावेळी मात्र श्री. मुश्रीफ सत्तारूढ गटाच्या विरोधात जातील, अशी एक शक्यता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत होती, पण विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेवर आले आणि राज्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील राजकीय संदर्भही बदलले आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी यांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत सद्यःस्थितीत खासदार प्रा. संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचेही काही नेते असतील, अशी शक्यता आहे. जिल्हा बॅंकेचे नेतृत्व श्री. मुश्रीफ करतात आणि त्यांच्या दृष्टीने बॅंकेची निवडणूक महत्त्वाची आहे. त्याच वेळी ‘गोकुळ’चे नेतृत्व करणारे आमदार पी. एन. पाटील व श्री. महाडिक यांची बॅंकेतील भूमिका महत्त्वाची राहणार आहे. बॅंकेत सहकार्य हवे असेल तर ‘गोकुळ’मध्ये मदत करा, असे पी.एन.-महाडिक यांचे श्री. मुश्रीफ यांच्याकडे साकडे आहे. त्याच वेळी राज्यातील सत्तेत गेल्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी मात्र जिल्ह्याच्या राजकारणात सावध भूमिका घेतली आहे. एकीकडे यापुढच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकसंधपणे लढवेल, असे पालकमंत्री पाटील व अन्य नेते सांगत असले, तरी श्री. मुश्रीफ यांनी मात्र जिल्हा बॅंक व ‘गोकुळ’बाबत कोणतेही विधान केलेले नाही.
दुसरीकडे महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी अलीकडेच केले आहे. पालकमंत्री पाटील व श्री. मुश्रीफ यांचे एकत्रित कार्यक्रम झाले, त्यातही श्री. पाटील यांनी ‘गोकुळ’बाबत काही भाष्य केले असले तरी श्री. मुश्रीफ यांनी त्याला बगल दिली आहे. श्री. डोंगळे यांनी काल राधानगरीत झालेल्या मेळाव्यात श्री. मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याची घोषणा केली असली तरी या कार्यक्रमातही श्री. मुश्रीफ यांनी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ठेवली आहे.
जिल्हा बॅंकेसाठी तडजोड
जिल्हा बॅंकेच्या राजकारणात पालकमंत्री पाटील यांचा थेट संबंध नाही. त्याच वेळी ही बॅंक पुन्हा आपल्या ताब्यात राहावी, यासाठी मुश्रीफ जोडणीला लागले आहेत. त्यात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पी. एन.-महाडिक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे बॅंकेसाठी श्री. मुश्रीफ यांच्याकडून तडजोडीचे राजकारण शक्य आहे.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.