तात्या लांडगे
सोलापूर : दिवाळीला सुरवात झाली असून बुधवारी (ता.२२) दिवाळी पाडवा आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या बळिराजाच्या बॅंक खात्यात मंगळवारी (ता. २१) भरपाई जमा होण्यास सुरवात झाली. चार लाख बाधित शेतकऱ्यांची नावे शासनाकडे अपलोड झाली आहे. बुधवारी (ता. २२) त्यांच्या खात्यात ५०० कोटी रुपयांची भरपाई जमा होण्याची शक्यता आहे.
जून ते ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे शेतकऱ्यांचे शिवार खरडून गेले. उरली सुरली आशा देखील अतिवृष्टी व महापुरामुळे मावळली. संपूर्ण जिल्ह्यातील सहा लाख चार हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सात लाख ६४ हजार १७३ शेतकरी बाधित झाले. संकटातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी ८६७ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मिळाला.
सुरवातीला दोन हेक्टरच्या मर्यादेत ८०८ कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी मिळाले. आता वाढीव एक हेक्टरची ५९ कोटींची भरपाई देखील मिळाली आहे. दरम्यान, सुरवातीला नदी काठच्या बाधितांची नावे प्राधान्याने अपलोड करण्यात आली. आता उर्वरित शेतकऱ्यांची नावे अपलोड केली जात असून त्यासाठी तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार परिश्रम घेत आहेत. त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आठ दिवसांत भरपाई जमा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बाधित क्षेत्र अन् भरपाई
१) जिरायती
बाधित क्षेत्र : २,५७,५९२ हेक्टर
शेतकरी : २,५६,२४९
भरपाई : २१८.९५ कोटी
------------------------------------------------------------------
२) बागायती
बाधित क्षेत्र : २,४०,७९४
शेतकरी : ३,७०,१८९
भरपाई : ४०९.३५ कोटी
----------------------------------------------------------------
३) बहुवार्षिक
बाधित क्षेत्र : १,०६,२५३
शेतकरी : १,३७,७३५
भरपाई : २३९.०८ कोटी
सर्व बाधित शेतकऱ्यांना मिळेल भरपाई
सोलापूर जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी शासनाला सर्वांची नावे अपलोड करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांची यादी अपलोड होईल. सध्या सुमारे चार लाख शेतकऱ्यांची नावे अपलोड झाली असून त्यांना ५०० कोटींची भरपाई मिळेल.
- अभिजित पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.