vad sakal
महाराष्ट्र बातम्या

केस, त्वचा, दात अन्‌ जखमांवर ‘ही’ झाडे बहुगुणी! वड, कडुनिंब अन्‌ पिंपळाला जपा अन्‌ आरोग्य सदृढ ठेवा

भारतीय संस्कृतीत वड, पिंपळ आणि कडुनिंबाला धार्मिक व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. केसांमधील कोंडा, केसांची वाढ, त्वचेला उजळपणा, दाताचे दुखणे, यासह शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठी त्याचा वापर होतो.

तात्या लांडगे

सोलापूर : भारतीय संस्कृतीत वड, पिंपळ आणि कडुनिंबाला धार्मिक व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. तिन्ही वृक्षाची साल, पाने मानवी आरोग्यासाठी फायद्याची असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध देखील झाले आहे. केसांमधील कोंडा, केसांची वाढ, त्वचेला उजळपणा, दाताचे दुखणे, यासह शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठी त्याचा वापर होतो.

कडुनिंबाचे झाड व पाने फायदेशीर

  • १) शरीरावर खाज येत असल्यास कडुलिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो. कडुलिंबाची ताजी पाने बारीक करून खाज असलेल्या भागावर लावल्यास खाजेपासून सुटका मिळेल. कडुलिंब टाळूची खाज देखील दूर करते. कडुलिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावल्यास त्याचे अ‍ॅटीफंगल गुणधर्म लगेचच प्रभाव दाखवतात.

  • २) केसात कोंडा झाल्यास एका पातेल्यात पाणी घालून कडुलिंबाची पाने उकळा आणि पाणी हिरवे झाल्यावर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर शॅम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवून घेतल्यास केस स्वच्छ होतात. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवरही कडुलिंब मदत करतो. कडुलिंबाची पावडर दररोज टाळूवर लावल्याने केस अकाली पांढरे होण्यास बंद होतात.

  • ३) कडुलिंबाचा वापर अनेक प्रकारे चेहऱ्यासाठी करता येतो. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचेलाही चमक येईल. कडुलिंबाचा फेस मास्क सुरकुत्या आणि वृद्धत्व कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. कडुलिंबाची पावडर हळद किंवा बेसनासोबत लावता येते. हा फेसपॅक बनवण्यासाठी दही, मधाचाही वापर करता येतो.

  • ४) कडुलिंबाची पाने बारीक करून कीटक चावलेल्या ठिकाणी देखील लावल्यास कीटकांद्वारे पसरणारे संक्रमण टाळता येते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून भाजीच्या रसासोबत पिऊ शकता.

  • ५) प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची २-३ पाने खाणे चांगले मानले जाते. ही पाने चवीला खूप कडू असतात, त्यामुळे ती पाण्यासोबत गिळू शकता. हिरड्या किंवा दातांमध्ये दुखत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते. तोंडाचा वास दूर होऊ शकतो.

बहुगुणी पिंपळ

पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे होतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकारावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालीचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. हडाप्पा अणि मोहोंजेदाडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत. पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

आयुर्वेद व सांस्कृतिक महत्त्व असलेला वड

वडाच्या पानांपासून जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल याचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात.

वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.

चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आढळतो. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ‘वड’ हे ब्रह्मदेवांचे निवासस्थान आहे, अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात.

वड, पिंपळ अन्‌ कडुनिंब आरोग्यासाठी फायद्याचे

वड, पिंपळ व कडुनिंबासह इतर पुरातन वृक्ष बहुगुणी आहेत. मानवी शरीरासाठी त्याचे खूप फायदे आहेत. केसांची वाढ, दातांचे दुखणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी, जखमा भरून काढण्यासाठी वड, पिंपळ, कडुनिबांची पाने, साल, चिक याचा वापर होतो. पण, त्याचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

- डॉ. विना जावळे, प्राचार्या, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

झाडे ही अन्न, वस्त्र, फळे, फुले, पाने देतात. आयुर्वेदामध्ये औषध उपचार म्हणून अनेक झाडांचा वापर केला जातो. तसेच पर्यावरणातील काही झाडांपासून रबर, विविध प्रकारचे इंधन सुद्धा प्राप्त होते. आपल्या सभोवतालचे अनेक लहान पक्षी झाडांच्या आधारेच आपले घर बांधतात व विसावा घेतात. या वृक्षांमुळे निसर्ग सुंदर होतो. वृक्षांचा मानवाला होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऑक्सिजन होय. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच संत तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे। आळविती।। येणे सुख रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष। अंगी येत।।.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT