कोल्हापूर : टाऊन हॉलच्या जवळ आणि सीपीआर हॉस्पिटलसमोर छोटी टुमदार इमारत आहे. राधाबाई बिल्डिंग म्हणून तिची तोंडोतोंडी ओळख झाली नाही. मात्र, कोर्टाची इमारत म्हणून ती बहूपरिचित आहे. त्याच परिसरात कोर्टाचा आणखी एक बंगला असावा तशी मुख्य न्यायालयाची इमारत. त्यासमोरच्या वास्तू मागे इंग्लंडच्या राजघराण्यातील व्यक्तींच्या पुतळ्यांचे प्रिन्सेस गार्डन होते. राधाबाई बिल्डिंगची दिवाण बिल्डिंग म्हणूनही ओळख होती. हा एक महत्त्वपूर्ण वारसावास्तूंचा समूह आहे.
दगडामध्ये ही दुमजली इमारत बांधण्यासाठी पस्तीस हजार रुपये खर्च आला होता. दिवाण ऑफिस म्हणून ती बांधली होती. इमारतीला छत्रपती राजाराम महाराज यांच्या भगिनी देवास संस्थानच्या महाराणी राधाबाई आक्कासाहेब यांचे नाव देण्यात आले. १२ ऑगस्ट १९२७ रोजी मुंबई सरकारच्या पॉलिटिकल विभागाचे सचिव जे. आर. मार्टिन यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.दोन्ही बाजूला षटकोनी आकाराच्या मनोऱ्यांना कमानी, जिने जोडून घेतलेली ही इमारत दोन मजली आहे. तळ मजल्यावर असलेल्या कमानीपेक्षा दुसऱ्या मजल्यावरील कमानी भिन्न आहेत. आतील बाजूस प्रशस्त दालने असून, वर जाण्यासाठी जिना मात्र दर्शनी भागातूनच डाव्या बाजूला गेलेला दिसतो. सर्वात वरच्या कठड्याला राधाबाई बिल्डिंग असे कोरून नाव लिहिले आहे.
इमारतीसमोर छत्रपती राजाराम महाराज याचा संगमरवरी पुतळा कोल्हापूरचे दिवाण असलेल्या रावबहादूर ए. बी. लठ्ठे यांनी बसवला असून, त्याचे उद्घाटन कोल्हापूरचे रेसिडेंट असलेल्या मेजर एल ई ल्यंक यांच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९२९ रोजी करण्यात आले.१८६७ मध्ये जिल्हा न्यायालयाची स्थापना झाली. त्यांनतर न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते.
राधाबाई बिल्डिंगच्या उत्तरेला १८७४ मध्ये बांधलेली न्यायालयाची इमारत ही गॉथिक पद्धतीची बैठी आहे. मुख्य न्यायाधीश बसण्याचाकक्ष पंधरा मीटर लांबी असलेला आणि तितकीच उंची असलेला लाकडी मनोरा अप्रतिम बांधणीचा आहे. न्यायासनाचे काम चालत असताना सर्वांना व्यवस्थित ऐकू जाईल अशी अतिशय उत्कृष्ट रचना हे या इमारतीचे वैशिष्ट्य आहे. त्या सभोवती इतर तीन इमारती आहेत.
या परिसरात काही विसंगत वाटणाऱ्या इमारती अलीकडे बांधल्याने जुन्या इमारतींचे सौंदर्य गमावले आहे. जाहिराती, इतर फलक, ऑईल पेंट यामुळे काही बदल खटकणारे आहेत. वारसास्थळ म्हणून जपताना हे भान असायला हवे. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालय व्हावे ही मागणीला या वास्तूही मूकसंमती देतील इतका महत्त्वाचा वारसा इथ नांदला आहे, तो जपला पाहिजे.
इंग्रजाविरुद्ध प्रतिक्रियेची साक्ष
२१ मार्च १९०८ रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या कन्या आक्कासाहेब यांच्या विवाहादिवशी व्हिक्टोरिया राणीच्या अर्धपुतळ्याचे मेघडबरीत मुंबई प्रांत गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सुंदर कारंजा असलेला मोठा गोल दगडी हौद आजही तेथे आहे. त्या सभोवती सातवा एडवर्ड, अलेक्झांड्रिया, कॅनॉट, ड्यूक असे पुतळे बसवले होते. १९१४ मध्ये कोल्हापूरकरांनी हे पुतळे काढून त्याजागी क्रांतिकारक १८५७ च्या बंडाचे अग्रणी चिमासाहेब महाराजांचा पुतळा बसवला. काढलेले पुतळे आज विद्रुप केलेल्या अवस्थेत इंग्रजाविरूद्ध कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रियेची साक्ष देतात.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.