Income Tax Return
सोलापूर : पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई व सोलापूरच्या आयकर अधिकाऱ्यांनी सोलापुरातील सात जणांच्या घरी व व्यावसायाच्या ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. बुधवारी (ता. १९) सकाळी सहा वाजता त्या व्यावसायिकांच्या व्यवहारांची तपासणी सुरु झाली. तब्बल १०५ तासांनंतर म्हणजेच रविवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास आयकर अधिकाऱ्यांची चौकशी थांबली. त्या ठिकाणचे पंचनामे आयकर अधिकारी रवाना झाले.
आयकर विभागाच्या माहितीनुसार सोलापुरातील आपटे ज्वेलर्स, त्यांचे व्यावसायिक भागीदार कोळी व वेणेगुरकर, दुसरे सराफ व्यापारी नारायणपेठकर, बांधकाम व्यावसायिक समीर गांधी, ‘हेरिटेज’चे मनोज शहा व ॲड. उमेश मराठे यांच्या मागील सहा वर्षांच्या व्यवहाराची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. या तपासणीत आयकर अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या नावावरील प्रॉपर्टी, अंगावरील दागिने, घरातील, कपाटातील व बॅंका, पतसंस्थांच्या लॉकरमधील दागिन्यांची माहिती घेतली. त्यांचे मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबमधील चॅट, माहिती, बॅकअप डेटा मिळविला.
दैनंदिन हिशेबाच्या नोंदवह्या, कच्च्या डायरी, वार्षिक उत्पन्न व सहा वर्षांत कमावलेली संपत्ती, रोखीने केलेले व्यवहार, याची कागदपत्रे ताब्यात घेतली. शेवटी जबाब घेऊन जप्त वस्तू, कागदपत्रांचा पंचसक्षम पंचनामा झाला. त्यानंतर आयकर अधिकारी सोलापूरहून त्यांच्या त्यांच्या विभागीय कार्यालयात रवाना झाले. या संपूर्ण तपासाचे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ शुटिंग केले आहे. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांची दुकाने, त्यांच्या आस्थापना उद्यापासून (सोमवारी) नेहमीप्रमाणे खुली रहातील.
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, पण...
सोलापूर शहरातील सात जणांवर आयकरच्या धाडी पडल्या. एकूण २४ ठिकाणी आयकर अधिकारी चौकशी करीत होते. पाच दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांना बरीच माहिती, कागदपत्रे मिळाली आहेत. भागिदारीत व्यवसाय करणाऱ्यांकडे आलेला पैसा, संपत्ती, त्याचा स्त्रोत, याचाही तपास झाला. सराफ व्यापाऱ्यांकडील दागिने, त्याचा हिशेब, व्याजाने पैसे देऊन जमा झालेले दागिने, सोन्याची बिस्कीटे, किलोने सापडलेले दागिने, त्याच्या नोंदी, खरेदीदस्त व साठीखताचे दस्त देखील ताब्यात घेतले आहेत. आता उपलब्ध कागदपत्रे व संबंधित व्यावसायिकांनी जबाबात दिलेली माहिती, याची पडताळणी होईल. त्यानंतर नेमका कोणी किती टॅक्स चुकविला किंवा नाही, हे स्पष्ट होईल असे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘कोडवर्ड’मधील आकड्यांची जुळवाजुळव
आयकर अधिकाऱ्यांना काही ठिकाणी सापडलेल्या कच्च्या वह्या व मोबाईलमध्ये ‘कोडवर्ड’मधील आकडे आढळले. काही मेसेजही तसेच होते. एकक, दशकामध्ये आढळलेले ते आकडे लाखात की कोटींचे आहेत, याचा अभ्यास प्राप्त झालेली माहिती व कागदपत्रांवरून केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.