chhatrapati shivaji maharaj Shivrajyabhishek sohala
chhatrapati shivaji maharaj Shivrajyabhishek sohala sakal
महाराष्ट्र

Shivrajyabhishek 2023: नव्या युगाचा प्रारंभ समजला जाणारा 'शिवराज्याभिषेक' शिवरायांनी का व कशासाठी केला ?

सकाळ वृत्तसेवा

- केदार फाळके

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सर्वोत्तम आनंददायी आणि मंगल क्षण होता, ज्यामुळे एक अतिशय शक्तिशाली राज्य निर्माण झाले. या राज्याचे अठराव्या शतकात साम्राज्यात रूपांतर झाले आणि भारताच्या पुढील सर्व पिढ्यांची शक्ती आणि भावना मराठा साम्राज्याच्या मध्यवर्ती उद्दिष्टांवर केंद्रित झाल्या.

छत्रपती शिवाजी महाराज शेकडो गडकोटांचे, जलदुर्गांचे, सहस्रावधी सेनेचे स्वामी झाले होते. हिंदू प्रजा महाराजांकडे आपले भाग्यविधाते म्हणून पाहू लागली. कवी भूषण त्यांना ‘हिंदुपति पातशाह’ म्हणू लागला. एवढे राज्य निर्माण झाले तरी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक झाला नव्हता. काशीचे गागाभट्ट नाशिक येथे आल्याचे कळताच महाराजांनी त्यांना आणण्यासाठी पालखी पाठविली. शिवाजी महाराजांचा एवढा पराक्रम पाहून ते म्हणाले, कीं, तक्तीं बसावें!

दिल्ली (इंद्रप्रस्थ), चितोड, कर्णावती, देवगिरी, विजयनगर, वारंगळ अशी सार्वभौम हिंदू सिंहासने संपुष्टात आल्यानंतर किमान एकशे नऊ वर्षे भारतभूमीत कोणीही हिंदू राजा सार्वभौम राहिला नव्हता, त्यास राज्याभिषेक झाला नव्हता. गागाभट्टांनी सुचविलेली ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ ही संकल्पनाच विलक्षण होती. सिंहासनारोहणासाठी गागाभट्टांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ हा मुहूर्त निवडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी गागाभट्टांनी ‘राज्याभिषेकप्रयोग’ अशी पोथी लिहिली.

राज्याभिषेक का आणि कशासाठी?

छत्रपती शिवाजी महाराज हे मुघलांचे मनसबदार आणि मांडलिक कधीच नव्हते. असे असले तरी ते सार्वभौम सिंहासनाधिष्ठित नव्हते. मुघल आणि आदिलशाहीसाठी ते एका जमीनदाराचा मुलगा होते. युरोपीयनांच्यासाठी ते एक बंडखोर होते आणि भारतीयांच्यासाठी ते वरचढ ठरलेले साधे सेनानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली वतने, इनामे, जहागिऱ्‍या तसेच त्यांनी केलेले करार, तह, इत्यादींना कायदेशीर स्वरूप येण्यासाठी महाराजांचा राज्याभिषेक होणे अत्यंत आवश्यक होते.

मुघल साम्राज्य म्हणजे भारताचे सार्वभौमत्व असे सर्वजण समजत असत. मुघलांशी झालेले करार म्हणजेच हिंदुस्थानशी झालेले करार असे समजले जात. मुघलांना श्रेष्ठ मुघल (द ग्रेट मुघल), मुघल सम्राट (द एम्परर ऑफ इंडिया) असे शब्दप्रयोग त्याकाळी आंतरराष्ट्रीय कागदपत्रांमध्ये वापरले जात. युरोपियांच्या किनारपट्टीवरील वसाहती वगळता हिंदुस्थानात स्वतंत्र असे काहीही नव्हते. सर्व राजपूत राज्ये, दख्खनेतील शाह्या ही मुघलांची मांडलिक होती.

एखादा राजा किंवा सुलतान मृत्यू पावला तर मुघल ते राज्य खालसा करीत. कोणतेही राज्य वंशपरंपरेने नाही असे समजण्यात येत असे त्यामुळे वारसांना राज्य मिळत नसे. कोणीही वडिलार्जित हक्क सांगू शकत नव्हता. एखादा वारस गादीवर येण्यासाठी मुघलांकडून परवानगी मिळाली तर मुघल त्यास मनसबदार करीत. ही मुघली मनसब म्हणजे नोकरीच होती. मुघल कागदपत्रांमध्ये राजपूतांचा उल्लेख वतनदार, जागीरदार असा येतो. एव्हढेच काय मुघलांनी पोर्तुगालचा उल्लेख ‘जमीदारे पोर्तुगाल’ आणि इंग्लंडचा उल्लेख ‘जमीदारे इंग्लंड’ असा केला आहे. मुघलांनी स्वतःला कधीही ‘हिंदू ’ म्हणविले नव्हते, ते स्वतःला नेहमी अभिमानाने ‘तुर्क’ म्हणवीत.

श्रीशिवराज्याभिषेक - हिंदू अस्मितेचा आविष्कार

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही हिंदुस्थानच्या इतिहासातील एक विलक्षण घटना आहे. राज्याभिषेक समारोह हा धार्मिक विधी असून तो ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी म्हणजे २९ मे, १६७४ पासून ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे ६ जून, १६७४ पर्यंत चालला. राज्याभिषेकाचा मुख्य विधी हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला झाला. समकालीन वर्णने वाचली म्हणजे हा समारोह किती भव्यदिव्य झाला याची कल्पना येते.

महाराजांना झालेल्या राज्याभिषेकाचे सभासदाने केलेले वर्णन अतिशय प्रत्ययकारी आहे. तो लिहितो, ‘येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह. मर्‍हाटा बादशाह येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट कांहीं सामान्य जाली नाहीं.’

मुघल सार्वभौमत्वाची तीन प्रमुख लक्षणे होती.

१. मुघल बादशाहांच्या नावाची सोन्याची नाणी पाडणे.

२. मुघल बादशाहांच्या नावाने संपूर्ण देशभर खुतबा पढणे

३. मुघल बादशाहांच्या नावाने जुलूस (कालगणना) चालविणे.

आपण मुघलांचे मांडलिक समजले जाऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तीन प्रमुख गोष्टी केल्या.

१. स्वतःच्या मस्तकावर छत्र धरून ‘छत्रपती’ म्हणविले.

२. स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडली.

३. राज्याभिषेक झाल्याच्या दिवसापासून कालगणना चालू केली, त्यास ‘राज्याभिषेक शक’ असे नाव दिले. हिंदू सार्वभौमत्वाच्या या प्रमुख तीन गोष्टी महाराजांनी राज्याभिषेकापासून सुरू केल्या.

राज्याभिषेकाचे दूरगामी परिणाम

छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची चांगली जाणीव होती की एके दिवशी औरंगजेब प्रचंड सेनासागर घेऊन संपूर्ण दख्खन जिंकण्यासाठी दिल्लीतून निघणार आणि पुढे तेच झाले. औरंगजेब १६८२मध्ये औरंगाबाद येथे दाखल झाल्यानंतर पुढची पंचवीस वर्षे तो मुगल साम्राज्याच्या राजधान्यांचे (आग्रा आणि दिल्ली) तोंड पाहू शकला नाही आणि पराभूत मानसिकतेत येथेच नगर शेजारी भिंगारला २० फेब्रुवारी १७०७ रोजी मृत्यू पावला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यांनी मुघलांविरुद्धचा लढा अधिक त्वेषाने लढविला, परंतु दुर्दैवाने ते कोकणात संगमेश्वर येथे पकडले गेले आणि वढू-कोरेगाव येथे ११ मार्च, १६८९ रोजी त्यांची औरंगजेबाने निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण स्वराज्य हादरले आणि राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडून दूर कर्नाटकात जिंजी या दुर्गाचा आश्रय घ्यावा लागला.

राजाराम महाराजांचा ३ मार्च, १७०० रोजी सिंहगडावर मृत्यू झाल्यानंतर मराठ्यांनी ताराराणींचे नेतृत्व स्वीकारले आणि औरंगजेबाला दीर्घकालीन युद्धात पराभूत केले. हे मराठा-मुघल युद्ध तब्बल २५ वर्षे चालले. एखादी लढाई हारणे म्हणजे युद्ध हरणे या तत्त्वाला मराठ्यांनी छेद दिला आणि मुघलांचा पराभव केला. आपापसांत भांडणारे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेऊन जे सिंहासन (तक्त) निर्माण केलं त्या सिंहासनाकरता लढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावर आरोहण करून राज्याला जो कायदेशीरपणा प्राप्त करून दिला होता त्याचा हा परिणाम होता.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी उच्च नैतिकता राखली होती ती खरोखरच त्या काळातील मराठा साम्राज्याची एक महान शक्ती होती. देशाला परकीय अत्याचारी धार्मिक संकटांपासून मुक्त करण्यासाठी स्थानिक लोकांच्या संघटनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अतोनात कष्ट घेतले. प्रजेच्या सर्व प्रकारच्या संघर्षांचे त्यांनी नेतृत्व केले.

विचारपूर्वक ठरविलेली, नियोजित आणि संघटित स्वरूपाची सामाजिक उन्नती तसेच प्रजेमध्ये ऐक्यनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज जीवनभर प्रयत्नशील राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सर्वोत्तम आनंददायी आणि मंगल क्षण होता, ज्यामुळे एक अतिशय शक्तिशाली राज्य निर्माण झाले. या राज्याचे अठराव्या शतकात साम्राज्यात रूपांतर झाले आणि भारताच्या पुढील सर्व पिढ्यांची शक्ती आणि भावना मराठा साम्राज्याच्या मध्यवर्ती उद्दिष्टांवर (दिल्ली जिंकून संपूर्ण भारत इस्लामी जोखडातून मुक्त करणे) केंद्रित झाल्या.

बाबराने पानिपतावर पहिला विजय मिळविल्यापासून मुघलांना एकामागोमागएक असे जे विजय मिळत गेले त्यामुळे भारतीय जगतात अशी समजूत निर्माण झाली की, मुघल अजिंक्य असून त्यांचा कोणीही पराभव करू शकत नाही. या समजूतीला पहिला सुरुंग लावला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुघलांविरुद्ध शस्त्रबळाने युद्ध पुकारून महाराजांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मुघलांचे शेकडो पराभव करून मुघल साम्राज्य मोडीत काढले.

मुघलांच्या झेंड्याखाली भारताचे कधीही एकत्रीकरण झाले नसते. कारण, मुघलांनी स्वतःला कधीही भारतीय न म्हणविता तुर्क म्हणविले आहे. त्यांची अशी भावना होती की आपण तुर्क असून हिंदुस्थानावर राज्य करीत आहोत. मुघल मनसबदारांमध्येही इराणी आणि तुराणी लोकांचा भरणा होता, तर मुघल प्रशासन हे इराण आणि इराकमधून आयात केलेले होते.

मुघल हे भारतात परकीय असल्याकारणाने बहुसंख्य असणाऱ्या हिंदू प्रजेबद्दल कमालीचा तिरस्कार करीत होते. ही गोष्ट त्यांच्या कृतीतून दिसून येते. मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर जिझिया आणि खराजसारखे कर, मुंडक्यांचे मनोरे रचणे, स्त्रियांना जनानखान्यात घालणे, हिंदूंच्या पवित्र ठिकाणी गोहत्या करणे, त्यांना गुलाम म्हणून विकणे, स्त्रिया, मुली आणि प्रजेचे धर्मांतर या गोष्टी नियमित सुरू होत्या, त्या पूर्णपणे बंद झाल्या.

मराठ्यांचे राज्य निर्माण झाल्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने त्यास कायदेशीरपणा प्राप्त झाल्याने मुघल साम्राज्यासारख्या परकीय आणि असहिष्णू सत्तेविरुद्ध संपूर्ण भारतातून जनक्षोभ उसळला. राज्याभिषेक समारंभाने हिंदू अस्मिता जागृत झाली आणि वैभवच्या अत्युच्च टोकावर पोहोचलेले मुघल साम्राज्य मराठ्यांनी मोडीत काढले.

पुढे इंग्रजांविरुद्धदेखील लढा देत असताना छत्रपती शिवाजी महाराज हेच स्वातंत्र्यलढ्यात सर्वांचे प्रेरणास्थान राहिले. आजही शिवचरित्र आपणास अखंड प्रेरणा देत आहे. हेच शिवाजी महाराजांचे आणि त्यांना झालेल्या राज्याभिषेकाचे भारतव्यापी महत्त्व आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय अस्मितेचा आविष्कार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT