सोलापूर : राज्य सरकारला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा ३,७५० कोटी रुपये तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सुमारे १५० कोटी रुपये द्यावे लागत आहेत. त्यातून सरकार महिला व तरुणांची काळजी घेत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मात्र राज्य सरकार वृद्धांकडे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या साडेसहा लाख ज्येष्ठांपैकी सुमारे चार लाभार्थींना तीन महिन्यांपासून लाभच मिळालेला नाही. त्यात सोलापुरातील ३१ हजार लाभार्थी आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने ६ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्णय घेत राज्यातील ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी ६५ वर्षे पूर्ण झालेल्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून दरवर्षी तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले.
योजनेच्या माध्यमातून वृद्ध नागरिकांना सहायता म्हणून काही उपयुक्त उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा तो निर्णय होता. त्यातून ज्येष्ठांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर अशी साधने करता येतील हा त्यामागील हेतू होता. पण, लाडक्या बहिणींना दरमहा लाभ देणाऱ्या सरकारने मागील तीन महिन्यांत एकाही ज्येष्ठाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ दिलेला नाही. आता त्यांना लाभ कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरमहा काढले जातेय ४००० कोटींचे कर्ज
राज्य सरकारच्या एक लाख १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याच्या निर्णयाला केंद्राने मान्यता दिली. त्यानंतर ‘आरबीआय’ने महाराष्ट्र सरकारच्या कर्जाचे कॅलेंडर मंजूर केले. त्यानुसार मागील आठ-दहा महिन्यांत राज्य सरकारने तब्बल ९० हजार कोटींपर्यंत कर्ज काढले आहे. सध्या राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरमहा चार हजार कोटींचे कर्ज काढले जात असल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दुसरीकडे राज्याला दरमहा सरासरी २८ ते ३० हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असताना तिजोरीत दरमहा सरासरी २० हजार कोटींचाच महसूल जमा होत असल्याचेही सांगितले.
नव्याने अर्ज करणे ऑक्टोबरपासून बंद
विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु झाली. विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२४ रोजी नव्या ज्येष्ठांना अर्ज करणे बंद झाले. अजूनपर्यंत नव्या ज्येष्ठांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली नाही.
वयोश्री योजनेची सद्य:स्थिती
एकूण अर्जदार
६.२५ लाख
लाभ मिळालेले लाभार्थी
२ लाख
दरवर्षी अनुदान
३,००० रुपये
अनुदानाच्या प्रतीक्षेतील अंदाजे लाभार्थी
४.०९ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.