सोलापूर : सद्य:स्थितीत राज्यातील १५ लाख ४७ हजार शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३० हजार कोटींची थकबाकी आहे. पूर्वीचे कर्ज थकल्याने सिबिल खराब झाले आणि या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. अशातच आता बॅंकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवायला सुरवात केली आहे. जिल्हा बॅंकांच्या आदेशानुसार विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या सचिवांनीही थकबाकीदार शेतकऱ्यांच्या घरांचा दरवाजा ठोठावायला सुरवात केल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
राज्यात चालू वर्षात (१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत) अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. गतवर्षीचा दुष्काळ, गडगडलेले शेतमालांचे दर, हमीभावाची प्रतीक्षा आणि यंदाचा अतिपाऊस आणि शेती पिकांचे नुकसान, सरकारकडून अपेक्षित भरपाई नाही, दुधाला रास्त भाव नाही, उसाची एफआरपी एकरकमी मिळत नाही, कांद्याचे दर घसरले, अशा प्रमुख समस्या त्यामागे आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा ओळखून महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची ग्वाही दिली होती.
दुसरीकडे भाजप महायुतीने विशेषत: खुद्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तरीदेखील, सध्या बॅंका वकिलांमार्फत किंवा बॅंकांच्या कर्मचाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून कर्ज भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर आता कर्जवसुलीला स्थगिती देऊन सरकार पुढील आर्थिक वर्षात कर्जमाफीचा निर्णय घेणार का, याकडे राज्यातील १५ लाख ४७ हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.
विकास सोसायट्यांमार्फत कर्जवसुली
शेतीकर्ज ३० जूनपूर्वी भरावेच लागते, पण कर्ज घेऊन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि त्याची परतफेड न झाल्यास संबंधित शेतकरी थकबाकीत जातो. आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतीकर्जाची मुदत संपली आहे, अशा शेतकऱ्यांकडील थकबाकी वसुलीसंदर्भात विकास सोसायट्यांना कळविले आहे.
- कुंदन भोळे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सोलापूर
शेती कर्जवाटपाची जूनपर्यंतची स्थिती
एकूण शेतकरी
१,३१,३४,८१९
एकूण कर्जवाटप
२,४९,५१० कोटी
थकबाकीदार शेतकरी
१५,४६,३७९
एकूण थकबाकी
३०,४९५ कोटी
‘या’ १२ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार
राज्यातील ३६ जिल्ह्यातील साडेपंधरा लाख शेतकऱ्यांकडे ३० हजार कोटींहून अधिक रुपयांचे शेतीकर्ज थकले आहे. आजही बॅंका शासनाचे आदेश असतानाही सिबिल पाहूनच कर्ज देतात अशी वस्तुस्थिती आहे. ३० जून २०२४ पर्यंत बुलढाण्यातील एक लाख नऊ हजार ५०२ शेतकऱ्यांकडे १०४८ कोटींची थकबाकी असून जालन्यातील एक लाख ३२ हजार ३७० शेतकऱ्यांकडे १६३५ कोटींची, परभणीतील एक लाख पाच हजार ५४७ शेतकऱ्यांकडे ११८० कोटींची थकबाकी आहे. याशिवाय पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, नाशिक, सोलापूर, वर्धा व यवतमाळ या १२ जिल्ह्यांमधील सर्वाधिक शेतकरी थकबाकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.