Supriya-Sule
Supriya-Sule 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस : कॉपी करून पास होण्याचा फडणवीसांचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

‘नरेंद्र मोदींचा पेपर कॉपी करून देवेंद्र फडणवीस भाषणे करताहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काय काम केले, हे सांगण्यासारखे त्यांच्याकडे नाही. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘सकाळ’चे प्रतिनिधी संजय मिस्कीन यांना सुळे यांनी दिलेल्या मुलाखतीचा हा अंश...

प्रश्‍न - रणधुमाळीत राष्ट्रवाद आणि काश्‍मीर, हे प्रचाराचे मुद्दे होताहेत. राष्ट्रवादीची तयारी कशी आहे? 
उत्तर - मला प्रामाणिक व नम्रपणे सांगावेसे वाटते, की राष्ट्रवाद हवाच. राष्ट्रवादाला कोणाचाही विरोध नाही; पण लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपने राष्ट्रवादावर निवडणूक लढवली आणि जिंकली. आता तशी स्थिती नाही, कारण महाराष्ट्राची निवडणूक जनतेच्या अशा-आकांक्षांवर आहे. कोसळलेली अर्थव्यवस्था, ठप्प विकास हे प्रमुख मुद्दे आहेत. बेरोजगारीने युवक निराश आहे. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. गुन्हेगारी चिंताजनक आहे. शिक्षणाचा स्तर ढासळलाय. जनता भाजपच्या भावनिक प्रचाराला बळी पडणार नाही.  

पण, फडणवीस यांनीदेखील प्रचारात ३७० कलम प्रमुख मुद्दा केलाय...
    होय. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून काय केले, याचा शोध घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभेतला पेपर कॉपी करून पास होण्याचा त्यांचा या वेळी प्रयत्न आहे. स्वकर्तृत्वाचा आलेख उंचावता आला नसल्याने त्यांना मोदींची कॉपी करावी लागते, हे दुर्दैव आहे. 

म्हणजे महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत काहीच काम झाले नाही, असे म्हणायचे काय? 
    तुम्हीच सांगा कोणत्या क्षेत्रात महाराष्ट्राने पाच वर्षांत भरारी घेतली? देशातील इतर राज्ये प्रगती करताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कमालीची घसरली. उद्योगातील गुंतवणुकीचे आकडे कागदावर मांडून जनतेची दिशाभूल केली जातेय. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आज मागे पडतोय. तेलंगणा, ओडिशा, बंगाल, आंध्रसारखी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे जाताहेत. त्याबद्दल वाईट नाही वाटत. पण, स्वत:च्या प्रेमात बुडालेल्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राची अब्रू जाते, याकडे लक्ष नाही. 

राष्ट्रवादीतून भाजपकडे अनेक नेते गेलेत ते कशासाठी? 
    आमच्या पक्षातील लोक सोडून गेले, त्याबद्दल नवल वाटत नाही. कारण या नेत्यांचे लाड राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात पुरवले. त्यांची घराणी राष्ट्रवादीने वाढवली; पण या नेत्यांना सोबत घेऊन त्यांना संपवण्याचा डाव भाजपचा आहे. गणेश नाईक यांचेच उदाहरण घ्या. आमच्याकडे असताना ते ठाणे जिल्ह्यातील चोवीस उमेदवारांच्या निवडीत अधिकार गाजवायचे. आता त्यांनाच स्वत:च्या उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतोय. या सर्वांना पाच वर्षांत त्यांची जागा कळेल. 

म्हणजे, हे सर्व नेते काही धाकदपटशामुळे गेले की काय? 
    नक्‍कीच. या नेत्यांना धाकदपटशा करूनच घेतले. त्यांची अनेक प्रकरणं सरकारने पुढे मांडली असावीत. त्यांना राजकीय अस्तित्वासाठी लढताना भाजप एखादी लाइफलाइन देईल, चौकशी थांबवली एवढंच त्यांच्या नशिबात आहे. राजकारणात त्यांना फार स्थान राहणार नाही, हे नक्‍की. 

या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती भक्‍कमपणे उभी आहे? 
    शिवसेनेची भूमिका समझोत्याची आहे. पाच वर्षे भाजपविरोधात कठोर भूमिका घेणारी शिवसेना अचानक इतकी मवाळ होते, याचा अर्थ दाल मे कुछ काला है! विचारांसाठी युती केली, तर मग पाच वर्षे का नव्हता हा समजूतदारपणा? भाजपच्या मित्रपक्षांच्या चौकशीच्या अनेक फाइल्स उघड्या आहेत. सगळ्या दिल्लीला ते माहिती आहे. त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे, त्यामुळेच समजूतदारपणा असावा. 

राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचाही मुद्दा आहेच, त्यावर टीका होते, त्याला काय उत्तर देणार? 
    घराणेशाहीला माझा स्पष्ट विरोध आहे. याबाबत माझी भूमिका स्पष्ट आहे, की घराणेशाही टाळता न येण्यासारखी आहे. सर्वच क्षेत्रांत ती आहे; पण लोकांनी एखाद्या घराण्यातील व्यक्‍तीला स्वीकारले, तर ती घराणेशाही कशी होऊ शकते? आमच्याकडे जेवढे घराणेशाहीतले नेते होते, ते आता मोदी-शहांकडे आहेत.

तुमच्या घराण्यात वारसाचा वाददेखील प्रचारात उपस्थित होतोय... 
    पवार घराणे म्हणजे ‘सांस भी कभी बहू थी’ अशी टीव्हीची मालिका नाही. अजितदादा अन्‌ माझ्यात कधीच भांडण होऊ शकत नाही. कारण आमची ध्येये वेगवेगळी आहेत. आमच्यात वाद लावून अनेकजण थकलेत. आता पार्थ आणि रोहितकडे वळलेत. जोपर्यंत दादा आणि मी जिवंत आहे, तोपर्यंत आमच्यात कधीही अंतर पडणार नाही. मी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा जोपासणार, हे नक्की. दादा राज्याचे राजकारण करणार हेही नक्‍कीच. 

फडणवीस सरकारला पाच वर्षे पुन्हा मिळाली तर...
    फडणवीस राजकारणी म्हणून यशस्वी असतील; पण प्रशासक म्हणून पूर्ण अपयशी आहेत. त्यांना पाच वर्षे मिळाल्यास राज्याचे चित्र काय असेल, त्यापेक्षा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्र अडीच वर्षांत अव्वल करून दाखवू!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT