तात्या लांडगे
सोलापूर : पावसाने दडी मारल्याने उजनी धरण, भीमा नदीवरील बंधाऱ्यांतील पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. शेतकऱ्यांकडून बेसुमार पाणी उपसा होऊ नये म्हणून सध्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिवसा केवळ २ तासच वीजपुरवठा केला जात आहे. याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असून, आमदार सुभाष देशमुख हे देखील अधिवेशनात प्रश्न मांडणार आहेत. त्यावर ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवत त्यांच्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करीत असल्याचे सांगितले.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सध्या उणे ३५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. जून संपत आला तरीदेखील सोलापूर जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, कडक उन्हामुळे पिकांसाठी जादा पाणी लागत आहे. मात्र, ‘महावितरण’कडून दिवसा वीज कपात आणि रात्री भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात घरगुती व शेतीचे कनेक्शन एकाच फिडरवर असलेली गावे ३०० हून अधिक आहेत. दिवसा वीज कपात केली जात असल्याने शेतकरी सिंगल फेजवर वीज जोडून शेतीला पाणी देत आहेत. त्यामुळे फिडरवर लोड येत असल्याने त्या गावची वीज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. सिंगल फेजवर शेतीचा कृषिपंप जोडणी थांबल्यावर वीजपुरवठा रात्री सुरळीत राहील, असेही अधिकारी सांगत आहेत.
आम्ही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय
भीमा नदीकाठावरील बंधाऱ्यातून कर्नाटकचे शेतकरी जास्त तास पाणी उपसतात, त्याकडे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. आम्ही महाराष्ट्रातील नदी काठच्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन ते तीन तास दिवसा वीज देत आहोत.
- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर
---------------------------------------------------------------------------------------
पाणी उपसा दोन राज्याचा विषय
भीमा नदीवरील भंडारकवठे, उमराणी हे बंधारे कर्नाटक राज्याच्या हद्दीत आहेत. तेथून आपले शेतकरी पाणी उपसतात. आपल्या हद्दीतील औज, चिंचपूर बंधाऱ्यातून कर्नाटकचे शेतकरी पाणी घेतात. हा दोन्ही राज्यांचा विषय आहे.
- एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
शेतीसाठी आता उजनीतून पाणी नाही
उजनी धरण उणे २० ते २५ टक्के झाल्यानंतर कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडता येत नाही. सध्या उजनी उणे २६ टक्क्यांपर्यंत पोचले असून धरणात ५० टीएमसी मृतसाठा आहे. धरणावर एकूण ४२ पाणीपुरवठ्याच्या योजना अवलंबून आहेत. याशिवाय सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील काही एमआयडीसींना उजनीतूनच पाणी जाते. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचीही तहान उजनीमुळेच भागते. त्यामुळे धरणातील पाणी सध्या पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.