Drugs
sakal
सोलापूर : सोलापूर शहरातील मुजम्मील हबीब कोथिंबीरे (वय २९, रा. साखर पेठ) व नीलेश बसवराज बिळूर (वय २७, रा. काडादी चाळ, रेल्वे स्थानकाजवळ) यांच्याकडून तीन लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. शनिवारी (ता. ११) रात्री सदर बझार पोलिसांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी रात्री सदर बझार पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सिद्धार्थ चौकातील पाण्याच्या टाकीजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या थांबलेले दिसले. पोलिसांची गाडी पाहताच ते पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर दोघांकडून एकूण १४.७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच त्यांच्याकडील दोन हजार रुपये रोख आणि दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही तरुण पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत.
न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल सावंत यांच्या नेतृत्वात पोलिस अंमलदार संतोष पापडे, मुलाणी, राजेश चव्हाण, बागलकोटे, प्रमोद पकाले, विशाल बोराडे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, परशुराम म्हेत्रे, अमीन शेख, सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, काशिनाथ वाडेकर आणि आनंद निंबाळकर यांच्या पथकाने केली.
एक म्हणाला, मुंबईतून आणले; दुसरा म्हणाला, रेल्वेतून एकाने दिले
दोन्ही तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवून एमडी ड्रग्जबाबत चौकशी केली. त्यावेळी एकाने, "आम्ही हे ड्रग्ज मुंबईतून आणले," असे सांगितले. तर दुसऱ्याने, "रेल्वेतून एकाने स्थानकावर आणून दिले," असे सांगितले. त्या व्यक्तीचे नाव विचारले असता, माहिती नसल्याचे त्याने सांगितले. दोघांनी ड्रग्ज कोठून, कोणाकडून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याचा तपास पोलिस करीत आहेत.
सतत जागा बदलतात; दोघांचे ग्राहक वेगळे
सोलापूर शहरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये संशयितांची ठिकाणे वेगवेगळी आढळून आली आहेत. सदर बझार पोलिसांनी पकडलेल्या दोघांपैकी मुजम्मीलकडे ६.८२ ग्रॅम (किंमत १ लाख ३६ हजार ४०० रुपये) आणि नीलेशकडे ७.८९ ग्रॅम (किंमत १ लाख ५७ हजार ८०० रुपये) एमडी ड्रग्ज आढळले. दोघांचेही ग्राहक वेगवेगळे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच ते ग्राहकांशी व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलिस त्यांच्या मोबाईलमधील माहितीची तपासणी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.