solapur univercity
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक समितीच्या बैठकीत अपूर्ण कामावरून बुधवारी (ता. २४) सदस्यांनी गोंधळ घातला. एकाने अधिकाऱ्यांवर पाण्याची बाटली फेकली, तर दुसऱ्याने उठून सर्व अधिकाऱ्यांवर भंडारा उधळला. यावेळी ‘या अधिकाऱ्याला हटवा, निकृष्ट दर्जाचे काम झाले, पैसे खाल्ले’ असे आरोपही करण्यात आले. गोंधळ सुरू असताना सर्व अधिकारी शांत होते. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनीदेखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. अहिल्यादेवींचा पुतळा आणून चबुतरा उभारण्यात आला आणि त्यावर पुतळा बसविण्यातही आला; मात्र, पाच वर्षांपासून तो झाकलेलाच आहे. स्मारकासाठी राज्य शासनाने १४ कोटींहून अधिक निधी दिला असून, त्याचा हिशोब सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आहे. विद्यापीठाला त्यातील किती पैसे शिल्लक राहिले आणि किती खर्च झाला, याबाबत माहिती देण्यात आलेली नसल्याचे एका वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाच्या लोकार्पणाचा विषय राज्यभर चर्चेत आहे. अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीदिनी स्मारकाचे लोकार्पण निश्चित होईल, अशी राज्यातील धनगर समाजबांधवांना आशा होती. मात्र, काम अपूर्ण असल्याने लोकार्पण लांबले.
आता ३०१ वी जयंतीदेखील झाली, तरीही काम अपूर्णच आहे. त्यामुळे आज (मंगळवारी) झालेल्या स्मारक समितीच्या बैठकीत शरणू हांडे, माऊली हळणवर, सुदर्शन क्षीरसागर आदींनी गोंधळ घातला. गोंधळानंतर कुलगुरूंसह सर्वजण स्मारकाच्या ठिकाणी गेले आणि नेमके कोणते काम शिल्लक आहे, याची पाहणी केली. आता १० दिवसांत काम पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१० दिवसांत काम पूर्ण करण्याचे ‘पीडब्ल्यूडी’चे आश्वासन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे थोडे काम राहिले आहे. तेथील भिंतीवर राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत लावायचे आहे. रस्त्याचेही काम शिल्लक असून फिनिशिंग बाकी आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १० दिवसांची मुदत मागितली आहे. ६ जुलैला पुढील बैठक बोलावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता निधी नसल्याचे सांगितले जात आहे; मात्र, त्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
‘पीडब्ल्यूडी’ने हिशोबच दिला नाही; आता म्हणतात, सगळे पैसे संपले
विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने १४ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी दिला आहे. २०१८ पासून अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) केले जात आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही स्मारकाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आता काम पूर्ण कधी होणार, अशी विचारणा केल्यावर ‘पीडब्ल्यूडी’ने निधी शिल्लक नसल्याचे उत्तर विद्यापीठाला दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.