boramani murder
sakal
सोलापूर : वडिलोपार्जित जमिनीत मृत पतीचा हिस्सा मागणाऱ्या वहिनीचा व तिच्या दोन्ही मुलांचा निर्घृण खून करणाऱ्या शंकर ऊर्फ पप्पू दत्तात्रय मस्के याला (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) पोलिसांनी विमानाने जाऊन बांगलादेशाच्या सीमेवर पकडले. पाच दिवसांत सुमारे चार हजार किलोमीटर प्रवास केलेला नराधम मस्के हा बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात सोलापूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे सीमेवर कडक पोलिस बंदोबस्त असल्याने त्याला पळून जाता आले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
बोरामणीतील गायत्री सुधाकर मस्के या आपल्या घराच्या टेरेसवर मुलगा शिवराजसह झोपल्या होत्या. त्यांची मुलगी प्रियांका स्टडी रूममध्ये होती. शंकर मस्के याने या तिघांचा तलवारीने वार करून शनिवारी (ता. २) मध्यरात्री खून केला. यात त्याची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज, मेव्हणा सूरज माधवराज मोरे, त्याच्या हॉटेलमधील कामगार सचिन शिवाजी वाघमारे यांना सोलापूर तालुका पोलिसांनी रविवारी अटक केली होती. त्यांची पोलिस कोठडी उद्या (शुक्रवारी) संपणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हत्याकांडाची माहिती या सर्व संशयितांना होती, अशीही माहिती समोर आली आहे. अटकेतील शंकरला देखील शुक्रवारीच (ता. ८) न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण, त्याला घेऊन येणारी पोलिसांची गाडी कधीपर्यंत सोलापुरात पोचते, त्यावर ते अवलंबून असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.
शंकर दीड लाख रुपये घेऊन गेला अन्...
वहिनी, पुतण्या व पुतणीचा खून करून शनिवारी पहाटेच्या सुमारास स्वतःच्या गाडीतून पप्पू ऊर्फ शंकर मस्के पसार झाला होता. सुरवातीला तो हैदराबादला गेला, तेथून तो तेलंगणा, ओरिसा, पश्चिम बंगालपर्यंत पोचला. त्याच्याकडे स्वतःची गाडी होती, त्यामुळे पोलिसांनी दक्षिणेकडील राज्यातील सर्वच टोल नाक्यांना अलर्ट दिला होता. त्याच्या गाडीला फास्टॅग असल्याने तो ज्या टोल नाक्यावरून पुढे जायचा, त्याची माहिती पोलिसांना मिळत होती. सोलापूर तालुका पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीने तत्काळ एक पथक विमानाने तिकडे पाठविले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोलापूर पोलिसांनी मस्केला पकडले. पोलिस मागावर असल्याने त्याने कोठेही मुक्काम केला नाही. पाच दिवस त्याने नुसता प्रवासच केला. जाताना त्याने दीड लाख रुपये नेले होते, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.