Nagpur Winter Session Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

विधिमंडळात पेटलं कोयनेचं पाणी! जयंत पाटील, विश्‍वजित कदम, विक्रम सावंत आक्रमक; सरकारला धरलं धारेवर

कोयनेतून पाणी कमी सोडल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोयनेतून पाण्याचा योग्य विसर्ग व्हावा, असे आदेश दिले आहेत. काही स्थितीत दोन जिल्ह्यांत वाद होत असतात. त्यात मी लक्ष घातले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सांगली : कोयना धरणातून (Koyna Dam) पाणी सोडण्याबाबत सांगली व सातारा पालकमंत्री यांच्यात समन्वय व संवाद नाही. कृष्णा नदी कोरडी पडली आहे. दुष्काळी स्थितीत पिकांचे नुकसान होत आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांच्या पूर्ण आवर्तनांवर परिणाम झाला. चार-पाच महिने दुष्काळी स्थितीशी सामना करायचा आहे.

सरकार यात लक्ष घालणार आहे का? विद्युत निर्मितीकडील कमी करून सिंचनासाठी अतिरिक्त पाणी सोडणार का?, असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेसचे विश्वजीत कदम, विक्रम सावंत (Vikram Sawant) यांनी आज विधानसभेत कोयना धरण वादाचा मुद्दा चर्चेला आणला. पुन्हा वाद होणार नाही, विसर्गात खंड पडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आजच्या चर्चेवरून कोयनेचे पाणी विधिमंडळातही पेटले, असेच म्हणावे लागेल.

दोन-तीन टीएमसीसाठी सांगलीवर अन्याय का?

आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘‘कोयनेतून पाणी कमी सोडल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे ताकारी व अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आलेत. जिल्ह्याचे हक्काचे ३२ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे व कृष्णा नदी कोरडी न पडू देणे याबद्दलची काळजी शासनाने घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी वेगवेगळी विधाने करीत आहेत.

खासदार महोदयांनी तर राजीनामा देतो, असे विधान केले. अशा विधानांमुळे, राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही, असा समज झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांत समन्वय नाही वा संवाद नाही, असेही दिसून आले. दोन, तीन टीएमसीसाठी ३२ टीएमसी पाण्यावर अन्याय करणे योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी स्थिती नाही.

ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जातं. या काळात पाणी दिले तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडले तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. तसेच कृष्णा नदीत पाणीसाठा राहील, असे सांगत असतानाच एप्रिल-मे मध्ये सांगली जिल्ह्यात पाण्याचा प्रचंड ताण येतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले जाते. वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी सांगली जिल्ह्याकडे वळवावे.’’

तुमच्या ३ टीएमसीसाठी सांगलीवर अन्याय नको

आमदार विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘ऑक्टोबरमध्ये कोयनेत १०० टीएमसी पाणी होत. नंतर ते ८५ टीएमसी झाले. ३७.५ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळायला हवे. या वर्षी सर्वात कमी पाऊस सांगली जिल्ह्यात पडला आहे. अतिवृष्टीने दुसरीकडे नुकसान झाले आहेच, मात्र सरासरी पाऊस खूप कमी आहे. पन्नास वर्षांच्या इतिहासात गणेशोत्सवात कृष्णा कोरडी पडली. गणपती विसर्जनाची अडचण झाली.

२५ दिवस विनंती करूनही पाणी सोडले जात नाही. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर यांनी विनंती करावी लागली. पुढील सहा महिन्यांत दुष्काळी तालुक्यात ताकारी, टेंभू, ताकारी पाणी नियमित सोडणे अपेक्षित आहे. फक्त तीन टीएमसी पाण्यासाठी आमच्या ३७ टीएमसीवर वाद होता कामा नये. आवर्तन लांबले तर पिके जळायला लागतात. शेतीचे नुकसान होते. कडेगाव, आटपाडी, जतमध्ये नुकसान होतेय.

कृष्णा नदीचे पाणी सोडताना ताकारी, टेंभू, म्हैसाळ आवर्तन पाळलेच पाहिजे. कर्नाटक राज्य महाराष्ट्राकडून घेतलेले उसने पाणी परत देणे लागते. त्याबाबत एक बैठक झाली होती. आता या सरकारने पुढाकार घ्यावा आणि कर्नाटकशी चर्चा करून जत तालुक्याला पाणी घ्यावे. कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत अधिकारी मदत करताहेत. मात्र, त्यांच्यावर दबाव आहे. वरून सूचना याव्यात, असे ते सांगतात. दोन जिल्ह्यांत ताण तणाव होता कामा नये.’’

जतला कर्नाटकातून पाणी मागणी करावी : सावंत

जतचे आमदार विक्रम सावंत म्‍हणाले, ‘कृष्णा नदीवर म्हैसाळ योजना आहे. त्यावर जत कायम दुष्काळी तालुका आहे. जत तालुक्यात ३८ टँकरद्‍वारे पाणीपुरवठा सुरू आहेत. रब्बीचे आवर्तन सुरू आहे. काही ठिकाणी गावतलाव, बंधारे आहेत. ते भरायला पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी मागितली जात आहे. ते पैसे माफ करून टंचाई निधीतून पैसे द्यावेत. उर्वरित जत तालुक्यातील गावांसाठी आंदोलने सुरू आहेत. विस्तारित योजना पूर्ण होईपर्यंत कर्नाटककडे पावणेआठ टीएमसी पाणी शिल्लक आहे, ते मागावे. तसा प्रस्ताव द्यावा.’’

कोयनेतून विसर्गात खंड नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘कोयनेतून पाण्याचा योग्य विसर्ग व्हावा, असे आदेश दिले आहेत. काही स्थितीत दोन जिल्ह्यांत वाद होत असतात. त्यात मी लक्ष घातले आहे. पाण्याचे जे वितरण ठरले आहे, त्यात कुठेही खंड पडू नये, असे निर्देश दिलेले आहेत. वीज निर्मिती कमी करून पाणी सिंचनासाठी देता येईल का, यावर मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. समजा पाणी वळवायचे झाले तर ते पिण्यासाठी वळवता येणे शक्य असते. तेही कठीण असले तरी दुष्काळ असल्याने पिण्यासाठी निर्णय घेता येईल. त्यासाठी महागडी वीज खरेदी करता येईल. त्याचा तिजोरीवर भार पडेल, मात्र हरकत नाही. गरजेनुसार निर्णय घेता येईल.’’

ते म्हणाले,‘‘कर्नाटकसोबत करार झाला पाहिजे, असाच आमचा प्रयत्न आहे. जेंव्हा गरज पडली तेंव्हा आपण त्यांना पाणी दिले आहे. त्यांच्याकडून पाणी द्यायचे असते तेंव्हा ते आपणास तंगवतात. आता करारच करण्याची गरज आहे. आता पुन्हा तसा प्रयत्न केला जाईल. कायस्वरुपी कराराचा प्रयत्न राहील.’’ दुष्काळी भागातील पाणीपट्टी अनेक वर्षे टंचाईतून भरली जातेय. कर्नाटककडील पाणी मिळण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार केला जाईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री फडणवीस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT