तात्या लांडगे
सोलापूर : शहरी तसेच ग्रामीण भागात माकड तसेच वानरांकडून मनुष्यांवर हल्ले होतात. तसेच घरे, शेतीचेही नुकसान होते. ते रोखण्यासाठी आता प्रशिक्षित माणसे नेमण्यात येणार आहेत. माकडे पकडल्यानंतर त्यांना वन विभागाने निश्चित केलेल्या जंगलात सोडण्यात येणार आहे. माकड पकडणाऱ्या त्या व्यक्तींना प्रति माकड ६०० रुपये आणि पाच माकडांमागे एक हजार रुपयांचा प्रवास खर्च देखील दिला जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिस, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, या तालुक्यांमध्ये अनेकदा वानर, माकडे आढळतात. ते गावात, नगरांमध्ये धुडगूस घालतात. बागा, शेतातील पिकांचे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या घटनांना आळा घालण्यासाठी आता वन व महसूल विभागाकडून महापालिका, नगरपालिका तसेच नगरपंचायतींसाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे.
माकड पकडणाऱ्यांना १० माकडांपर्यंत प्रतिमाकड ६०० रुपये, तसेच दहापेक्षा अधिक माकडांसाठी प्रतिमाकड ३०० रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम १० हजारांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे पाचपेक्षा अधिक माकडे पकडणाऱ्यांना प्रवास खर्चही दिला जाणार आहे.
फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंगचे बंधन
गावात, नगरांमधील किंवा शेतात पकडलेल्या प्रत्येक माकडाचा, वानराचा फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे बंधनकारक राहील. माकडांना कोणतीही दुखापत न होता केवळ जाळी आणि पिंजरे या सारख्या सुरक्षित आणि गैर दुखापतकारक पद्धतीचा वापर उपद्रवी माकड किंवा वानर पकडण्यासाठी करावा लागणार आहे. पकडलेल्या माकडांवर उपचार करून त्यांना मानवी वस्तीपासून दूर १० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर वनक्षेत्रात त्यांच्या अधिवासात सोडावे लागणार आहे. त्यानंतर वन विभागाकडून माकडांचे मुक्तता प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
माकडे, वानर पकडणाऱ्यांना मिळणार पैसे
वन विभागाने उपद्रवी माकड, वानर पकडणाऱ्यांना ६०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो निधी नेमका कसा दिला जाईल, त्याची नेमकी कार्यपद्धती कशी असणार, याबद्दल शासनाकडून मार्गदर्शन होईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या निर्णयामुळे शेती, गावातील, नगरांमधील माकडे, वानरांचा उपद्रव थांबेल, अशी आशा आहे.
- अजित शिंदे, सहायक वनसंरक्षक, सोलापूर