सोलापूर : इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सध्या त्यांची तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कोणताही तणाव न ठेवता आनंदाने परीक्षेची तयारी करावी. परीक्षा काळात पुरेशी झोप आणि पहाटे अभ्यास करावा. तसेच प्रश्नपत्रिकांचा सराव व स्वत: नोट्स काढून अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना निश्चितपणे चांगले गुण मिळू शकतात, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता बोर्डाने २०१८ ते २०२४ या काळात ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीसारखे गैरप्रकार आढळले, त्या केंद्रांवर बाहेरील शाळांमधील पर्यवेक्षक व केंद्र संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे पथके व भरारी पथके असणार आहेत. पण, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनात कोणतीही भीती बाळगू नये, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता प्रश्नपत्रिकांचा सराव, स्वत: नोट्स काढून त्याचा अभ्यास आणि शांत ठिकाणी मोठ्याने वाचून अभ्यास केल्यास त्याचा फायदा टक्केवारी वाढण्यास होऊ शकतो. परीक्षा काळात दररोज रात्री साडेदहावाजता झोपावे आणि पहाटे पाच-साडेपाच वाजता उठून अभ्यास केल्यास मनावर कोणताही ताण किंवा दडपण राहात नाही. दुसरीकडे परीक्षा काळात घरातील वातावरण देखील शांत व आनंदी राहणे आवश्यक असून घरात कोणीही चिडचिडपणा व भांडण करू नये, असेही तज्ज्ञ सांगतात.
‘या’ बाबी आवर्जून लक्षात ठेवाच....
रात्रीची झोप पुरेशी व्हायला हवी. किमान सहा तास तरी झोपावे. जेणेकरून थकवा जाणवणार नाही
पहाटेची शांतता उत्तम असते आणि झोपेतून उठल्यावर मन शांत असल्याने शक्यतो पहाटेच अभ्यास करावा
रात्री उशिरापर्यंत जागरण करण्यापेक्षा पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंतची वेळ अभ्यासासाठी उत्तम
शांत ठिकाणी बसून मोठ्याने वाचल्याने तो आवाज कानाने ऐकला जातो आणि तो अभ्यास सहजपणे लक्षात राहतो
मन आनंदी ठेवून करावा अभ्यास
अभ्यास करताना नेहमीच मन शांत व स्थिर हवे. शांत ठिकाणी अभ्यास करावा, पहाटे पाच ते सकाळी नऊही अभ्यासाची वेळ उत्तम आहे. परीक्षा काळात जागरण, चिडचिड नको. कोणताही तणाव न घेता विद्यार्थ्यांनी मन आनंदी ठेवून अभ्यास करावा, त्याचा निश्चित फायदा होतो.
- डॉ. गायत्री देशपांडे, आयुर्वेदतज्ज्ञ, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.