तात्या लांडगे
सोलापूर : सायबर गुन्हेगारांनी नागरिकांकडून लंपास केलेली रक्कम आता ३० दिवसांत परत मिळणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवे मॉड्यूल (एमआरएम) तयार केले आहे. फसलेला व्यक्ती https://mrm-ncrp.mha.gov.in या लिंकवर जाऊन सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्यानंतर बॅंकेने होल्ड केलेली रक्कम परत मागू शकणार आहे. त्यासाठी फसलेल्या व्यक्तीने आधी १९३० या क्रमांकावर फसवणुकीची तक्रार देणे आवश्यक आहे.
सायबर गुन्हेगारांचे बळी ठरलेल्या व्यक्तीकडे ‘१९३०’ हा हेल्पलाइन क्रमांक किंवा तक्रार नोंदविल्यावर मिळालेला १४ अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे. आपल्या तक्रारीवरून होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी तक्रारदार ऑनलाइन अर्ज करू शकतो. त्यावेळी बॅंक त्या खात्यातून किती रक्कम परत मिळू शकते याची खात्री करते आणि आपल्याला मेसेजद्वारे माहितीही दिली जाते. ‘एमआरएम’वर तक्रार नोंदविल्यावर बॅंकेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागतो. दरम्यान, ५० हजारांपेक्षा कमी रकमेसाठी आपल्याला पोलिसांत फिर्याद (एफआयआर) द्यायची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज नसणार आहे.
पण, रक्कम ५० हजारांपेक्षा जास्त असल्यास त्यासाठी मात्र कोर्ट ऑर्डरची प्रत लागते. त्यावरून तक्रारदार त्याची होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी बॅंकेला अर्ज करू शकतो. त्यासाठी कोर्ट ऑर्डर बंधनकारक असल्यास तपास अधिकारी संबंधित बॅंकेला त्याची माहिती देऊन खातेदाराची ती रक्कम संबंधितास परत मिळावी म्हणूनही अर्ज करू शकतो. बॅंक त्याबद्दल खात्री करून तक्रारदाराच्या खात्यात ती रक्कम ट्रान्सफर करेल, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली.
तक्रारदाराने अर्ज कसा करायचा....
‘एमआरएम’ची लिंक उघडून तक्रारदाराने तेथे आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर आलेला ओटीपी टाकून तक्रार नोंदवावी. त्यानंतर तक्रारदारास आपले पॅनकार्ड, बॅंक खाते क्रमांक व ‘आयएफएससी’ कोड टाकून अर्ज सबमिट करावा. त्यानंतर एक युनिक रिक्वेस्ट क्रमांक येईल, त्यावरून तक्रारदारास दैनंदिन स्टेटस पाहाता येईल. दरम्यान, ५०० रुपयांचा बाँड तक्रारदाराला पोलिसांना द्यावा लागतो. बॅंकेला तो बाँड आवश्यक आहे. त्यावरून पोलिस बीएनएस कलम १०६(३)नुसार संबंधित बॅंकेला पत्र पाठतील. त्यानुसार ती रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा करण्यास बॅंकेला कळवतील. त्यानंतर होल्ड केलेली रक्कम ३० दिवसांत खातेदाराला परत मिळते.
अडचण असल्यास सायबर पोलिसांची मदत घ्यावी
ऑनलाइन फसलेल्या व्यक्तीने तत्काळ १९३० क्रमांकावर तक्रार द्यावी, जेणेकरून रक्कम पुढे वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर होणार नाही. आपल्या तक्रारीवरून खात्यातील ट्रान्सफर होणारी रक्कम लगेच आहे त्या खात्यातच ‘होल्ड’ होते. त्यानंतर ती रक्कम तक्रारदारास ३० दिवसांत परत मिळवता येते. त्यासाठी ‘एमआरएम’वर तक्रारी नोंदवावी लागते. कोणाला याबद्दल अडचण असल्यास ते सायबर पोलिसांत येऊन माहिती घेऊ शकतात.
- भालचंद्र ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.