तात्या लांडगे
सोलापूर : आर्थिक अडचणींमुळे मिथुन राठोड (वय ४५, रा. फताटेवाडी, ता. दक्षिण सोलापूर) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. ४) गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, एनटीपीसीने प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार असल्याचे सांगूनही ती न दिल्याने मिथुनने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आणि मृतदेह सकाळी नऊपासून रात्री नऊपर्यंत तब्बल १२ तास एनटीपीसीच्या गेटसमोरच ठेवला होता. संतप्त नातेवाइकांनी एनटीपीसीच्या गेटवर दगडफेकही केली.
एनटीपीसी प्रकल्पासाठी मिथुन राठोड यांच्या कुटुंबाची सुमारे ४० एकर जमीन संपादित झाली होती. त्यात मिथुनची तीन एकर जमीन गेली होती. त्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी मिथुनला कोणतेही साधन उरले नव्हते. आर्थिक अडचणीमुळे मिथुन वारंवार एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटत होता. नोकरीसाठी अर्जही केले होते, पण त्याची दखल घेतली जात नव्हती. आई-वडील नसल्याने कुटुंबाची जबाबदारी मिथुनवरच होती. त्यास दोन वर्षाचा मुलगा होता. एनटीपीसीने संपादित जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे आश्वासन दिले, पण तो वाढीव मोबदला दिलाच नाही. तसेच स्थानिकांना नोकरीचे आश्वासनही पाळले नाही. त्यामुळेच मिथुनने टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे होते. नातेवाइकांनी मिथूनचा मृतदेह घेऊन एनटीपीसीचे गेट गाठले आणि गेटसमोरच ठिय्या मांडला. त्याठिकाणी वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पोचले. त्यांनी नातेवाइकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाइकांनी माघार घेतली नाही.
काहींनी एनटीपीसीच्या गेटवरून दगडफेकही केल्यानंतर पोलिसांनी दोन मोठ्या व्हॅन बोलावल्या होत्या. शेवटी, रात्री नऊच्या सुमारास नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधीसाठी नेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भूसंपादनाचा मोबदला आम्ही दिला होता, आम्ही त्यांचे कोणतेही देणे लागत नव्हतो, असे एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदेंनी दिला धीर, अन्...
सकाळी आठ वाजल्यापासून फताटेवाडीतील मिथुन राठोड याचा मृतदेह घेऊन नातेवाईक एनटीपीसीच्या गेटसमोर ठिय्या मांडून असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदेंना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नातेवाईकांशी संवाद साधला. त्यावेळी ‘मृतदेहाची विटंबना नको, एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांना मी बघून घेते, मी या प्रकरणात लक्ष घालते, न्याय नाही मिळाला तर येथे मी कुलूप घालते’ अशी ग्वाही त्यांनी मिथुन राठोड यांच्या नातेवाइकांना दिली. त्यानंतर मिथुनचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला आणि तेथून सर्वजण गेले.
दीड-दोन वर्षाचा चिमुकला पोरका
आत्महत्या केलेल्या ४५ वर्षीय मिथुन राठोड यांना दीड ते दोन वर्षाचा मुलगा आहे. मिथुनला आई-वडील नव्हते, तो पत्नी व आपल्या चिमुकल्यासोबत रहायला होता. मिथुनने आत्महत्या केल्याची खबर मिळताच त्याच्या पत्नीने टाहो फोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.