सोलापूर : सोलापूरसाठी १५ ते ३० मे या कालवधीत कोणत्याही स्थितीत विमानसेवा सुरू होणार आहे. याची सुरुवात गोव्यापासून होईल. नंतर मुंबईलाही विमानसेवा सुरू होईल, असे ठाम आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी दिले. आशीर्वाद हे विमानसेवेच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच इतक्या आत्मविश्वासाने व स्पष्टपणे बोलले. विमानसेवेमुळे सोलापुरात उद्योग गुंतवणूक आणि आयटी पार्क उभारणीला वेग येईल, असेही ते म्हणाले.
गोव्यासाठी लवकरच पहिले उड्डाण होईल, अशी बातमी दैनिक सकाळने ३१ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. प्रशासकीय पातळीवर त्या दिशेने वेगवान हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. हॉटेल सेंटर पॉईटच्या सभागृहात आज जिल्हास्तरीय उद्योग परिषद पार पडले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते, मैत्रीच्या अधिकारी प्रियदर्शनी सोनार, सीडबीच्या अधिकारी ऐश्वर्या जाधव, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी चिमाजी राठोड, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम वाखरडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, निर्याततज्ज्ञ श्रीजीत नायर, न्यू इंडिया ॲश्युरन्सचे सुशांत चंदनशिवे उपस्थित होते.
जिल्ह्यात वर्षात दुप्पट झाली उद्योग गुंतवणूक
उद्योग खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत म्हणाले, यावर्षी जिल्ह्यात उद्योग गुंतवणूक मागील वर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे. यावर्षी ३ हजार कोटींचे उद्योग उभारले जातील. मुख्यमंत्री रोजगार योजनेत ९४ टक्के उद्दीष्ट पूर्ण करून नवे उद्योग सुरू झाले आहेत. आता लघू उद्योगाची गुंतवणूक मर्यादा ५ वरून २५० कोटी झाली आहे. त्यामुळे ज्या उद्योगांना लघु उद्योग योजनांचे लाभ मिळत नव्हते ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, जिल्ह्यातील ९० टक्के उद्योगांना विकासाची संधी मिळणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील तीन हजारापैकी केवळ एक ते दीड हजार लघु उद्योग कक्षेत येत होते. आता जवळपास पावणेतीन हजार उद्योग लघु उद्योगाच्या कक्षेत येतील.
महसूल विभागाचे राहील सहकार्य
लघु उद्योगांना मदत करणारी सीडबी या शासकीय बॅंकेची शाखा चिंचोली एमआयडीसीत पुढील पंधरवड्यात सुरू होत असल्याची माहिती बॅंकेच्या अधिकारी ऐश्वर्या जाधव यांनी दिली. गावठाण जागेतील उद्योगांना एनए पत्र मिळण्यासाठी तहसीलदारांची सनद देण्याची मोहीम हाती घेतल्याचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले. कृषी पर्यटन उद्योगांनाही महसूलचे सहकार्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.