महाराष्ट्र

आक्रमक सत्ताधारी, हतबल विरोधक 

ज्ञानेश्वर बिजले

राज्याच्या विधानसभेची निवडणूक शंभर दिवसांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने आक्रमक पवित्रा घेत आत्ताच पुढील सरकारच्या स्थापनेची तयारी सुरू केली आहे, तर त्यांच्या तुलनेत विरोधी पक्ष मात्र सध्या हतबल स्थितीत असल्याचे दिसून येते. काँग्रेस तर लोकसभेतील पराभवातून अद्याप सावरलेलीच नाही. येत्या दोन महिन्यांत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करण्यात विरोधी आघाडी यशस्वी न ठरल्यास त्यांचे भवितव्य धुसर दिसते. 

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी 217 मतदारसंघांत भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. दोनशेच्या आसपास त्यांचे आमदार आहेत. त्यापैकी 75 टक्के म्हणजे दीडशे जागा जरी त्यांना राखून ठेवता आल्या, तरी राज्यातील सत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात राहील. राज्यात बहुमताचा आकडा 145 जागांचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 220 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. देशातील सध्याचे राजकीय वातावरण पाहिल्यास, युतीला पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांना मोठी तयारी करावी लागणार आहे. 

भाजप-शिवसेना युती होणारच 

या दोन पक्षांची युती होणार, की गेल्या वेळेप्रमाणे ते स्वतंत्र लढणार याबाबतच्या शंका कार्यकर्त्यांच्या मनात उभ्या राहात असतात. वेगवेगळे मंत्री, नेते यांची परस्परविरोधी वक्‍तव्ये त्याला खतपाणी घालतात. त्याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दोन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बैठक घेतली.

कोणत्याही नेत्यांनी परस्पर जाहीर वक्‍तव्ये करू नयेत, अशा स्पष्ट सूचना या दोन्ही नेत्यांनी आमदारांना दिल्या. युती होणारच असल्याचे शिक्कामोर्तब त्यांनी केले. जागा वाटपावरून वाद रंगण्याची शक्‍यता असली, तरी या दोन्ही नेत्यांनी जागा वाटपाची जबाबदारी स्विकारल्याने सध्या तरी त्या बाबत फारशा चर्चा रंगणार नाहीत. 

काँग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या उमेदवारांचा राज्यात दारुण पराभव झाल्याने, त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. कॉंग्रेसचा एकच खासदार निवडून आला. मात्र, तेही शिवसेनेतून शेवटच्या क्षणी कॉंग्रेसमध्ये आले होते. त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला. मात्र, त्या भागात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे, विधानसभेला या विजयाचा फारसा फायदा कॉंग्रेसला होणार नाही. कॉंग्रेसमधून विरोधी पक्षनेते बाहेर पडले, आणखी काही आमदार पक्षातून बाहेर पडण्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे, कॉंग्रेसच्या नेत्यांनी कणखर भुमिका घेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर मित्र पक्षांशी जागा वाटपाचा निर्णय लवकर घेण्याची आवश्‍यकता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली सुरू 

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा आघाडीतील दुसरा महत्त्वाचा पक्ष. यंदा त्यांचे चार खासदार निवडून आले. गेल्या वेळची संख्या त्यांनी राखली असली, तरी मतदारसंघ बदलले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात आघाडीचे विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. तेथे कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात त्यांना लोकसभा निवडणुकीत पाचपैकी एकही जागा मिळाली नाही.

आघाडीचेच कार्यकर्ते शेवटच्या टप्प्यात युतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि आघाडीच्या मतपेटीला खिंडार पाडतात, हे गेल्या दोन्ही निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे, आघाडीचा निर्णय लवकर घेतानाच निवडून येण्याची क्षमता असलेल्या स्थानिक नेत्याच्या मागे आघाडीच्या नेत्यांनी भक्कमपणे उभारण्याची आवश्‍यकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. त्यांच्यासोबत कॉंग्रेसनेही पक्षांतर्गत हालचाली सुरू केल्या पाहिजेत. या आघाडीत शेतकरी कामगार पक्षांसह अन्य काही स्थानिक पक्षही सहभागी होण्याची शक्‍यता आहे. 

वंचित विकास आघाडीचा परिणाम 

गेल्या वेळी पंचरंगी सामने ठिकठिकाणी रंगले होते. यंदाच्या निवडणुकीत वंचित विकास आघाडी हा तिसरा कोन पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभेत त्यांच्या उपस्थितीमुळे काही मतदारसंघांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. वंचित विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची दिल्लीला नुकतीच बैठक झाली, त्यामध्ये विधानसभा निवडणुकीत एकत्र लढण्याचे ठरले. ही आघाडी राज्यातील अनेक मतदारसंघांतील राजकीय चित्र बदलू शकते. त्यांचा निवडणूक निकालावर निश्‍चितच परिणाम होईल. 

मनसेबाबत उत्सुकता 

"लाव रे तो व्हिडिओ', असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकपणे लोकसभा निवडणूक प्रचारात झोकून दिले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाची भूमिका जाहीर करू, असे ठाकरे म्हणाले होते. युतीच्या विरोधात मुंबई, ठाणे, नाशिक अशा ठिकाणी काही मतदारसंघांत ते आव्हान उभे करू शकतात. ते स्वतंत्रपणे लढणार, की विरोधी आघाडीत सहभागी होणार, या बाबत उत्सुकता राहील. 

विरोधी पक्षांच्या आघाडीची रचना येत्या दोन महिन्यांत कशी होणार आहे, त्यावर येत्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. विरोधकांनी आघाडीचा निर्णय लवकर घेऊन युतीपुढे आव्हान उभे केले, तरच त्यांना थोडीफार आशा आहे, अन्यथा सध्यातरी युतीच निवडणुकीच्या रिंगणात आघाडीवर असल्याचे दिसून येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT