maharshtra-politics
maharshtra-politics 
महाराष्ट्र

धक्‍के आणि  बुक्‍के!  

प्रकाश अकोलकर

अवघ्या बारा तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सारीपटावर सुरू असलेला साराच डाव विस्कटून गेला. हार सामोरी आलेला खेळाडू पट उलथून निघून जातो; पण इथं डाव आपल्याच खिशात जाणार, हे स्पष्ट झालेलं असतानाही तो खेळाडू मोठ्या कष्टानं मांडलेला डाव मोडून निघून गेला. अर्थात, महाराष्ट्राच्या राजकारणानं दिलेले असे धक्‍के मराठी माणसाला जसे नवे नाहीत, त्याचबरोबर अनेकांच्या पदरी आलेला तोंड दाबून बुक्‍क्‍यांच्या माराच्या कहाण्याही फार जुन्या नाहीत.

गेल्या महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक महिना होत असताना, मोठ्या कष्टानं शरद पवार यांनी मांडलेला हा डाव एका रात्रीतील कट-कारस्थानानं विस्कटला आणि बरोबर दोन दशकांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी या एकमेकांच्या विरोधात कडवी झुंज दिलेल्या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार कसं स्थापन केलं, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसमधून आपली हकालपट्टी ओढवून घेत, राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष उभा केला होता. तेव्हाच केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अवघ्या एका मतानं कोसळलं होतं. त्या वेळी प्रमोद महाजन यांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सहा महिने आधीच घेण्याचा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांच्या गळी उतरवला. दरम्यान, झालेल्या कारगिल युद्धातील विजयामुळे जनता वाजपेयींच्या नावानं जयजयकार करत होती, हे त्यामागील मुख्य कारण होतं. लोकसभेत पुन्हा वाजपेयींच्याच नेतृत्वाखालील ‘एनडीए’ला विजय मिळाला; पण महाराष्ट्रात आक्रित घडलं. शिवसेनेला ७३, तर भाजपला अवघ्या ५६ जागा मिळाल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. खरं तर अपक्षांच्या मदतीनं ‘युती’चं सरकार येऊ शकलंही असतं. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरला. तो मान्य झाला नाही आणि दरम्यानच्या १५-२० दिवसांत एकमेकांविरोधात लढलेल्या आणि दोन्ही मिळून १३३ जागा जिंकणाऱ्या दोन्ही काँग्रेसनं मिळून, अपक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केलं. जनमत कौलाच्या विरोधात जाऊन म्हणजेच आजच्या भाषेत स्थापन झालेल्या या ‘अभद्र’ आघाडीनं पुढे चक्‍क आणखी दोन निवडणुका जिंकत १५ वर्षं राज्य केलं!

यशवंतराव चव्हाणांची बाजी
मात्र, त्यापूर्वी म्हणजे संयुक्‍त महाराष्ट्राचं आंदोलन शिगेला पोचलेलं असताना, १९५६ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं आणि महाराष्ट्रात नेतृत्वाचा प्रश्‍न उभा राहिला. तेव्हा त्या स्पर्धेमध्ये भाऊसाहेब हिरे आघाडीवर होते आणि तेच मुख्यमंत्री होणार, असे सर्वांनाच वाटत होतं. मात्र, फलटणला निंबाळकरांच्या वाड्यावर रात्रीचीच बैठक झाली आणि नेतेपदासाठी झालेल्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाणांनी बाजी मारली आणि एकच खळबळ उडाली! अर्थात, हिरे आपल्या मर्जीनुसार वागणार नाहीत, हे लक्षात येताच मोरारजीभाईंनी काँग्रेसचे तमाम गुजराती आमदार यशवंतरावांच्या पाठीमागे उभे केल्यानेच त्यांना हे यश मिळालं होतं, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. ‘रात्रीस खेळ चाले!’ ही राजकीय रंगमंचावरील मालिका खरं तर इतकी जुनी आहे!

शिवसेनेच्या कोलांटउड्या
शिवसेनेनं आपल्या पाच दशकांच्या वाटचालीत मारलेल्या कोलांटउड्या तर अवघ्या ‘मराठी माणसा’ला ‘धक्‍के आणि बुक्‍के’ देणाऱ्याच आहेत! शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली; मात्र त्यापूर्वी १९६० मध्येच बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ हे व्यंग्यचित्र साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यातून संयुक्‍त महाराष्ट्राला कडवा विरोध करणाऱ्या स. का. पाटील यांच्यावर अत्यंत तिखट भाषेत वार केले जात होते; पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर वर्षभरातच आलेल्या १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनीच आपले सख्खे मित्र साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ‘गद्दारी’ करून चक्‍क पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. एवढंच नव्हे तर शिवसैनिकांनी पाटील यांच्या प्रचारासाठी जिवाचं रानदेखील केलं. मात्र, तेव्हा मराठी माणसानं बाळासाहेबांचा ‘आदेश’ झुगारून देत विजयाची माळ फर्नांडिस यांच्याच गळ्यात घातली होती. 
सत्तरच्या दशकात शिवसेनेनं मारलेल्या कोलांटउड्या या तर चित्तचक्षूचमत्कारिकच म्हणाव्या लागतील! आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं आणीबाणी उठवल्यानंतर १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात मुंबईत उमेदवार उतरवले. मात्र, त्यापैकी एकही विजयी होऊ शकला नाही. पुढे शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं, तोही खेळ रात्रीसच तेव्हाच्या पवार यांच्या ‘रामटेक’ बंगल्यावर रंगला होता. मात्र, १९८० मध्ये पुन्हा विजयी होताच इंदिरा गांधी यांनी पवारांचं सरकार बरखास्त केलं आणि विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्यावेळी शिवसेनेनं कमाल केली! बाळासाहेबांनी तेव्हा काँग्रेसची पालखी खांद्यावर घेत, थेट काँग्रेस उमेदवारांचा प्रचारच केला आणि त्या बदल्यात विधान परिषदेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. त्याच दशकात बाळासाहेबांनी एकदा बनातवाला यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगशीही हातमिळवणी केली होती आणि त्यांच्या समवेत भायखळा परिसरातील मस्तान तलावावर मोर्चाही नेला होता!

त्यापुढचं आक्रित घडलं...
१९८० हे दशक गिरणी संपामुळे गाजलं, संप चिघळला, तेव्हा बाळासाहेबांनी जॉर्ज फर्नांडिस तसेच शरद पवार यांच्याबरोबर एक संयुक्‍त सभा घेतली आणि महाराष्ट्राचं भवितव्य पवारांच्या हाती सुरक्षित असल्याची ग्वाही दिली! मात्र, याच बाळासाहेबांनी पुढच्या चार-सहा वर्षांतच हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतली आणि पवारांची अत्यंत अर्वाच्य आणि असंसदीय भाषेत खिल्ली उडवण्याचे जाहीर कार्यक्रम शिवाजी पार्कवर लावले!
आता याच बाळासाहेबांची शिवसेना त्याच पवारांच्या मांडीला मांडी लावून बसली आहे... मात्र, आता त्यापुढचं आक्रित घडलं आणि पवारांचे वारसदार अजितदादा पवार भारतीय जनता पक्षाच्या तंबूत जाऊन बसले. बॉलीवूडच्या कोणत्याही सनसनाटी ‘थ्रिलर’पेक्षा खिळवून ठेवणारा, असाच हा रात्रीचा खेळ! मात्र, तो टीव्हीच्या छोट्या पडद्यावर बघायला मिळत नाही. तर तो संपल्यावरच त्याबाबतचे चर्वितचर्वण आता अवघा महाराष्ट्र बसलेल्या धक्‍क्‍यातून स्वत:ला सावरत आणि स्वत:लाच बुक्‍के मारून घेत बघत आहे.

भुजबळांचे खळबळजनक पक्षांतर
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर अशा मालिका अनेकदा रंगल्या आहेत. त्यातील सर्वाधिक तणाव निर्माण करणाऱ्या मालिकेचे नायक होते छगन भुजबळ! १९९१ मध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू असताना भुजबळांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र!’ करण्याचा निर्णय घेतला आणि एकच वादळ उठलं होतं. तेव्हा मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते आणि शिवसेना आमदारांचं बळ ५२ इतकं मजबूत होतं. त्यातून तेव्हाच्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार भुजबळांच्या मागे १८ आमदार असणं आवश्‍यक होतं आणि ते होतेही. मात्र, तेव्हा शिवसेनेची दहशत प्रचंड होती आणि त्यापायीच भुजबळ भूमिगतही झाले होते. मात्र, याच दहशतीला भिवून या १८ मधील सहा आमदार स्वगृही परतले! भुजबळांचा डाव उधळला जाण्याची शक्‍यता निर्माण झाली, तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी हे काँग्रेसच्या मदतीला धावून आले. त्यांनी या सहा आमदारांचा वेगळा गट आहे, असा निर्णय दिला आणि त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून भुजबळ आणि त्याचे शिवसेनेला रामराम करणारे अन्य आमदार सुटू शकले. मात्र, संतप्त शिवसैनिकांनी तेव्हा काही महिने भुजबळांना मुंबईत फिरणं मुश्‍किल करून सोडलं होतं. अर्थात, बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लखोबा लोखंडे’ असं नामकरण केलेल्या भुजबळांना पुढच्याच म्हणजे १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या माझगाव या बालेकिल्ल्यात बाळा नांदगावकर या तेव्हा फारशी ओळख नसलेल्या शिवसैनिकानं धडा शिकवला. त्यानंतर भुजबळांनी माझगावलाही ‘जय महाराष्ट्र!’ केला आणि येवल्याची वाट धरली, ती आजतागायत कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT