Accident
sakal
सोलापूर : तुळजापूर नाका सर्व्हिस रोडवर डंपरचा धक्का लागून दुचाकीवरून पतीसोबत निघालेल्या तीन महिन्यांची गरोदर महिला ठार झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (ता. २०) सकाळी नऊच्या सुमारास घडला. कुसुम चोलाराम पटेल (वय २७, रा. चाटी गल्ली, बाळीवेस) असे मृत महिलेचे नाव आहे.
गर्भवती महिला कुसुम आणि पती चोलाराम हे मूळचे छत्तीसगढ येथील असून, मजुरीच्या निमित्ताने सध्या ते सोलापुरात राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत कामावर जायला पती-पत्नी दुचाकीवरून डबलसीट निघाले होते. रूपाभवानी मंदिराजवळून तुळजापूर नाका येथील पुलाखालून त्यांची दुचाकी वळली. त्याचवेळी भरधाव डंपरचा दुचाकीला धक्का लागला. त्यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या कुसुम रस्त्यावर पडल्या. त्यांच्या कमरेला जोरात मार लागला होता.
सर्वांगास खरचटले होते. जखमी पत्नीला पती चोलाराम यांनी उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी कुसुम अर्धशुद्धीवर होत्या. उपचार सुरू असताना त्यांचा ब्लडप्रेशर खूपच कमी झाला होता. उपचारादरम्यान गर्भवती कुसुम यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती चोलाराम आणि दोन मुले आहेत. या घटनेची नोंद जोडभावी पोलिसांत झाली असून, पोलिस उपनिरीक्षक सागर बामणे तपास करीत आहेत.
डंपरचालकाला दुचाकी दिसली नाही, अन्...
डंपरच्या बाजूने वाट काढत पुढे निघालेली दुचाकी डंपरचालकाला दिसली नाही. रूपाभवानी मंदिरापासून पुढे गेल्यावर कॉर्नरला हा अपघात झाला. पोलिसांनी डंपर जप्त केला असून, चालकाला ताब्यात घेतले. पण, अपघातानंतर घाबरलेल्या चालकाचाही ब्लडप्रेशर कमी झाल्याने त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. डंपरची आता ‘आरटीओ’मार्फत तपासणी होणार आहे. अपघात प्रकरणी डंपरचालकावर जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, मृत कुसुमच्या पतीने फिर्याद दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.