नाशिक : जाणीवपूर्वक वक्तव्य करून उचकविताना राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न सुरु असले, तरी सत्तेवर आहोत तोपर्यंत राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावे यासाठी प्रयत्न करत राहू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे नमूद केले. लोकप्रतिनिधींवर कालची (ता.२३) हल्ल्याची घटना घडायला नको होती. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिस सीसीटीव्ही, माध्यमकर्मींच्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासून योग्य दिशेने तपास करतील, अशी हमी त्यांनी दिली.
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. तरी नवीन प्रश्न निर्माण करून अस्थिरता निर्माण करण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. आम्ही विरोधी पक्षात राहिलो आहोत. आम्हाला पोलिस यंत्रणेने काही सूचना केली, तर आम्ही त्या स्वीकारून संबंधित ठिकाणी जाण्याचे टाळायचो.
राज्यघटनेनुसार प्रत्येकाला प्रार्थनेचा अधिकार असला तरी त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला नको. संबंधित लोकप्रतिनिधींनी आपल्या घरी, मंदिरात प्रार्थना, हनुमान चालिसा म्हणायला हरकत नाही. परंतु ‘मातोश्री‘समोर प्रार्थना म्हणण्याचा अट्टहास चुकीचा आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्याने हा प्रकार घडला.
केंद्राची सुरक्षा असूनही लोकप्रतिनिधींवर हल्ल्याची घटना घडली, याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, की राज्यात प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटले पाहिजे, अशी आमची भावना आहे. परंतु पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून धरलेल्या अट्टहासामुळे संबंधित घटना घडली.
तारतम्य बाळगून कारभार चालावा
राज्यापुढील समस्या बघता शांतता नांदली पाहिजे. अशा परिस्थितीत भावनांवर नियंत्रण ठेवताना तारतम्य बाळगून राज्य कारभार करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे पवार यांनी सांगितले.
सर्वांनी सामंजस्याने घ्यावे : वळसे पाटील
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाली, हे खरे असून, ती कोणाकडून झाली हा पोलीस तपासाचा भाग आहे. पण सगळ्यांनीच समजुतीने घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. सोमय्यांनी असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आल्याचेही वळसे पाटील म्हणाले. त्यामुळेच पोलीसांनी योग्य ती कारवाई केल्याचे सांगत राणा दांपत्याच्या अटकेचे समर्थनही केले. राणा दांपत्यामागे कुणाचा तरी हात निश्चित आहे. त्याशिवाय ते इतके धाडस करू शकत नाहीत. नेमके कुणाच्या सांगण्यावरून हे सुरु आहे शोध घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.