तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पण, हा निर्णय शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांसाठी नाही, असा संभ्रम होता. परंतु, मुख्याध्यापकांना देखील ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) शाळांवरील शिक्षकांसाठी पात्रता निश्चित केली आहे. त्यानुसार २०१० पासून ‘टीईटी’ची अट घालण्यात आली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे, त्यांना देखील दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. मुदतीत पात्रता पूर्ण न केल्यास संबंधितांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांच्या पदोन्नती देखील ‘टीईटी’ उत्तीर्ण असेल तरच दिली जाणार आहे.
शिक्षकांनाही निवड व वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ‘टीईटी’ बंधनकारक आहे. यामुळे सद्य:स्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या सुमारे ३५ ते ४० शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. ज्या शिक्षकांची सेवा १२ वर्षे, २० वर्षांपेक्षा जास्त झाली आहे, त्यांना वेतनश्रेणीसाठी आता ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. आता उन्हाळा सुट्ट्यांमध्ये या शिक्षकांना उतारवयात देखील ‘टीईटी’चा अभ्यास करावा लागणार आहे.
‘बीएड’वर नियुक्ती, तरीही ‘टीईटी’ आवश्यकच
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांवरील नियुक्त शिक्षकांना (निवृत्त होण्यास पाच वर्षे शिल्लक असलेले वगळून) दोन वर्षांत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. माध्यमिक शाळांवरील इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त शिक्षक बीएडधारक असला, तरीदेखील त्यांच्यासाठी ‘टीईटी’चे बंधन आहेच.
मुख्याध्यापकांसाठीही ‘टीईटी’चे बंधन
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील नियुक्त शिक्षकांसाठी ‘टीईटी’ उत्तीर्ण बंधनकारक आहे. सहावी ते आठवीच्या वर्गांवरील नियुक्त शिक्षक डीएड, बीएडधारक असेल, त्यांना देखील न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. त्यानुसार राज्य शासनाने टीईटी उत्तीर्ण असलेले व नसलेले, अशी माहिती मागितली आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर