तात्या लांडगे
सोलापूर : शालेय शिक्षण विभागाच्या १ सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यायची, असा शासन निर्णय होता. यात बदल करण्यात आला असून दरवर्षी १ ऑगस्टपर्यंत टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पात्र शिक्षकांना पदोन्नती मिळेल, असे वेळापत्रक आज शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. टीईटी-सीटईटी पात्रताधारक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी नवीन सुधारित नियमावली व वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ मे रोजी काढलेले पत्र रद्द करून चालू वर्षातील व पुढील वर्षांतील पदोन्नतीची प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक आयोजित केली जाईल. बैठकीच्या तारखेपर्यंत उमेदवारांचा सेवा कालावधी, टीईटी, सीटीईटी आणि इतर आवश्यक पात्रता विचारात घेतली जाईल. त्यानंतर संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जातील.
दरवर्षीचे वेळापत्रक वेगळे
दरवर्षी १ जानेवारी रोजी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून ३१ जानेवारीपर्यंत हरकतींनंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान समितीची बैठक घेऊन पुढील एका आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस केली जाईल. ३१ मार्चपर्यंत पदोन्नतीचे आदेश देऊन २ मे रोजी शिक्षकांना नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले जाईल. या वेळापत्रकानुसार सर्व जिल्हा परिषदांना अंमलबजावणी अनिवार्य असणार आहे. नवीन कार्यपद्धतीत संपूर्ण राज्यात एकसूत्रता असावी यासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
पदोन्नती मिळालेल्यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदत
पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२५ पूर्वी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीचा लाभ मिळणार होता. पण, नव्या शासन निर्णयानुसार आता १ ऑगस्टपर्यंत पात्रता पूर्ण करणाऱ्यांनाही पदोन्नतीचा लाभ मिळेल. टीईटी नसतानाही पदोन्नती झालेल्यांना मात्र ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.