तात्या लांडगे
सोलापूर : सध्या अभियांत्रिकी, एमबीए, एमएमएस, बीई आणि बी.टेक. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतर अर्ज भरल्यानंतर लगेचच, म्हणजे ३ ते १३ जुलैदरम्यान, कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. २० जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या एससी, व्हीजेएनटी (व्हीजे/डीटी), एनटी (अ), एनटी (ब), एनटी (क), एनटी (ड), ओबीसी, एसबीसी आणि एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ‘जात वैधता प्रमाणपत्र’ (कास्ट व्हॅलिडिटी) अनिवार्य आहे. एससी व एसटी प्रवर्ग वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकडे ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध असलेले नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या ३१ मे २०२१ च्या निर्णयानुसार पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. दरम्यान, प्रवेश अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी १६ ते १८ जुलैपर्यंत तक्रार नोंदवता येणार आहे. उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी १५ जुलैला प्रसिद्ध होईल, तर २० जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
...तर प्रवेश होईल ‘ओपन’मधून
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरताना प्रमाणपत्रांऐवजी कागदपत्रांची केवळ पोचपावती अपलोड केली, तर त्यांना चौथ्या कॅप राउंडच्या अंतिम रिपोर्टिंगपूर्वी मूळ प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयात जमा करावी लागतील. मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्या विद्यार्थ्यांचा आरक्षित जागेवरील प्रवेश रद्द होईल. मात्र, पात्रता गुण असल्यास त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गातून संधी मिळू शकते. तसेच, ई-स्क्रुटिनीदरम्यान अर्जात आढळलेल्या त्रुटी मुदतीत दुरुस्त न केल्यास उमेदवार गुणवत्ता यादीतून बाहेर पडतो.
मनात शंका असल्यास ‘या’ क्रमांकावर करा कॉल
उमेदवारांच्या शंका निरसनासाठी +९१-९१७५१०८६१२ आणि १८००२०९८८५१ हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहेत. प्रवेशाचे वेळापत्रक आणि स्क्रुटिनी केंद्रांची यादी ‘सीईटी’ सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संस्थात्मक कोटा किंवा ‘कॅप’अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्क्रुटिनी केंद्राकडून कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज निश्चित करणे बंधनकारक आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड : २ ते १२ जुलै
कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती : ३ ते १३ जुलै
अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी १,००० रुपये
आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीच लागतात
अभियांत्रिकी प्रवेशासाठी यंदा दोनदा ‘सीईटी’ झाली. त्यातील सर्वाधिक गुण ग्राह्य धरले जातात. सध्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अचूक अर्ज भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी फिजिकल आणि ऑनलाइन स्क्रुटिनी, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, केगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.