सोलापूर : सुर्डी (ता. बार्शी) येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत घुसून शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हवेत दोन गोळ्या झाडून व्यवस्थापकाच्या हातावर कोयत्याचा वार करून दरोडा टाकणाऱ्या तिघांना बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या ४५ मिनिटातच जेरबंद केले. सुर्डीच्या शाखेतून अपेक्षित रोकड हाती न लागल्याने कोरफळेतील शाखेत दरोडा टाकण्यासाठी तिघेही तेथे थोडे थांबले. पण, बंदुकीत गोळी नसल्याने व त्याठिकाणी गर्दी असल्याचे पाहून तिघेही दुचाकीवरून पळाले, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
बॅंकांमध्ये वसुलीचे काम करणाऱ्या सागर बोकेफोडे याने तीन महिन्यांपूर्वी सुर्डी व कोरफळे शाखेतील रोकड, ग्राहकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला. तो मूळचा बार्शीचाच पण सध्या फलटणमध्ये स्थायिक आहे. त्याने किरण किसन लोंढे व एका विधीसंघर्षग्रस्त मुलाची मदत घेतली. दरोड्यासाठी फेसबुकवरील माहितीवरून त्यांनी कानपूरवरून बंदूकही आणली. त्यांनी दरोड्यासाठी शुक्रवार निवडला आणि सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास तिघेही बॅंकेत शिरले. तोंडाला माकडटोपी घालून एकाच्या हातात बंदूक तर दुसऱ्याच्या हातात कोयता होता. बंदूक उंचावून सर्वांना हात वर करायला सांगून त्यांनी फायरिंग केले. एक गोळी उडवताना चुकून बंदूक ऑटो झाली आणि दोन्ही गोळ्या उडाल्या. एक लाख ५४ हजारांची रोकड घेऊन ते तेथून पसार झाले. याची खबर काहीवेळात बार्शी तालुका पोलिसांपर्यंत पोचली.
पोलिस नाईक अभय उंदरे यांनी सुर्डीच्या जिल्हा बॅंकेत दरोडा पडला असून तिघांनी फायरिंग करून ३० ते ४० लाखांची रोकड लुटल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांना दिली. दरोडेखोर दुचाकीवरून कासारवाडी रोडने निघाले. त्यानंतर खांडवीच्या दिशेने वळले आणि काही अंतरावर गेल्यावर पुन्हा कासारवाडी रोडच्या दिशेने निघाले होते. पोलिस कर्मचारी सिद्धेश्वर लोंढे, अभय उंदरे, युवराज गायकवाड व सागर शेंडगे या सर्वांनी सहायक पोलिस निरीक्षक श्री. ढेरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.
दुचाकीवर झडप मारून तिघांनाही खाली पाडले, अन्...
काही वेळाने दरोडेखोरांची दुचाकी आल्याचे दिसताच सहायक पोलिस निरीक्षक श्री. ढेरे यांनी त्यांच्यावर झडप टाकली व तिघांनाही खाली पाडले. त्यावेळी एकाने त्याच्याकडील पिस्टलला हात घातला तर दुसऱ्याने कोयता काढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान साधून ढेरे यांनी स्वत:कडील पिस्टल लोड करून दरोडेखोरांच्या दिशेने रोखले. अन्य चार पोलिस कर्मचारी तेथे आले आणि त्या सर्वांनी दरोडेखोरांना पकडून पोलिस ठाण्यात आणले. त्यातील विधीसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध एका हॉटेल व्यवस्थापकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याचीही बाब तपासात समोर आली आहे.
बॅंकेच्या शाखांमध्ये नाहीत सीसीटीव्ही कॅमेरे
३०७ वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या जिल्हाभर शाखा आहेत. पण, सुर्डीतील शाखेच्या दरोड्याची माहिती घेताना त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बाब समोर आली. सहायक पोलिस निरीक्षक श्री. ढेरे म्हणाले, बॅंकेच्या अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.