महाराष्ट्र

भवानीनगरला सराफ दुकानावर दरोडा

सकाळवृत्तसेवा

भवानीनगर - येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ किलोची चांदी हस्तगत केली. मात्र, १६ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पाच जण फरारी झाले. 

शौकत शेख, शमीम शेख, अजिरूज शेख (मूळ रा. झारखंड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. मबलू शेख, बिलू शेख (दोघेही रा. पश्‍चिम बंगाल) व आणखी तिघे (नावे माहीत नाही) असे पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. गुरुवारी (ता. २५) पहाटे अडीचच्या सुमारास येथील बसस्थानकाच्या पाठीमागील श्रीपाद ज्वेलर्स हे दुकान पाठीमागून फोडण्यासाठी या सर्वांनी पाच किलोची गॅस टाकी, ऑक्‍सिजन सिलिंडरसह गॅस कटर आणला होता. नव्या कटावण्या, पक्कड अशी साधनेही सोबत आणली होती. पाठीमागच्या बाजूला अंधाराचा फायदा घेऊन रजू शेख याने गॅस कटरने भक्कम दरवाजा तोडला. त्या दरवाजातून तिघांनी आत प्रवेश करून पुन्हा आणखी एक दरवाजा गॅस कटरने तोडला. त्यानंतर आत प्रवेश करून अगोदर चांदीचे दागिने एका बॅगमध्ये भरले. त्यानंतर आतमधील तिजोरीचा खालचा भाग गॅस कटरने कापला. या दरम्यान शेजारील द्वारका डेअरीचे मालक रमेश पांढरे यांना   काही तरी हालचाल सुरू असल्याचे जाणवल्याने, त्यांनी दुकानाचे मालक पंकज शहाणे यांना फोन करून कल्पना दिली. पंकज शहाणे तेथून काही मीटर अंतरावरच राहतात. त्यांनी तातडीने दुकानापुढे येऊन पाहणी केली. तेथे काही हालचाल नव्हती, म्हणून ते पाठीमागे गेले. तर, पाठीमागील दरवाजा तुटल्याचे त्यांना दिसले. त्यांनी लगेच पोलिस चौकी गाठली. तेथे होमगार्डचा स्वयंसेवक भेटला. त्याला माहिती सांगेपर्यंत योगायोगाने गस्त घालत असलेले वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद काटे हे त्यांच्या पथकातील भानुदास जगदाळे, रूपेश नावडकर, होमगार्ड विठ्ठल चव्हाण, अश्विन बनसोडे, पोलिस नाईक शिंदे, चौधर यांच्यासह तिथे पोचले. त्यांना शहाणे यांनी दुकानात चोरी होत असल्याची माहिती देताच क्षणाचाही विलंब न लावता काटे यांनी पोलिस जीप थेट दुकानाच्या मागच्या बाजूस नेऊन दरवाजाला आडवी लावली. तोपर्यंत चोरट्यांनी तिजोरी फोडून आतील सोन्याचे दागिने चोरले होते. मात्र, जीपचा उजेड दिसताच सारे काम अर्धवट टाकून चोरटे पळण्यासाठी बाहेर आले. मात्र, काटे यांनी चपळाई दाखवत दोघांना तेथेच व एकाला नंतर जेरबंद केले. यामध्ये जिल्हा बॅंकेच्या सुरक्षारक्षकानेही पोलिसांना मदत केली.

जागरुकतेमुळे मोठे नुकसान टळले
दरोडा टाकताना पोलिस येऊ शकतात, याची कल्पना नसल्याने चोरट्यांनी चांदीचे दागिने असलेली पिशवी काही अंतरावरच ठेवली होती. ती पोलिसांनी हस्तगत केली. त्यामध्ये साडेआठ किलो चांदीचे दागिने आढळून आले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहाणे यांनी कर्ज काढून दागिन्यांची खरेदी केली होती. मात्र, शेजारील दुकानदाराच्या जागरूकतेने मोठे नुकसान टळले. भवानीनगरमधील नागरिकांनी सहायक निरीक्षक अरविंद काटे यांचे आज सकाळी स्वतः भेटून कौतुक व अभिनंदन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT