सोलापूर : सोलापुरात गुरुवारी वेगळेच दृश्य पाहायला मिळाले... दुपारी एक वाजताची वेळ...पावसाच्या सरी बरसत होत्या... पण, अशा भर पावसातही दोन हजाराहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उभे राहून डीजेमुक्त सोलापूरसाठी एकच हाक देत होते. भावी पिढीचा हा ठाम संदेश; ‘डीजेमुक्त सोलापूर हाच पर्याय’ असल्याची जाणीव करून देत होता. “कर्णकर्कश डीजे बंद करा”, “सोलापूर १०० टक्के डीजेमुक्त झालेच पाहिजे”, अशा गगनभेदी घोषणांनी सात रस्ता परिसर ते चार हुतात्मा चौक हा व्हीआयपी रोड दणाणून गेला होता.
डीजेमुक्त सोलापूरसाठी ‘सजग सोलापूरकर समिती’तर्फे आयोजित मानवी साखळीला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर महाविद्यालय, सुयश विद्यालय, हिंदुस्थानी कॉन्व्हेंट, रॉजर्स स्कूल, मेरी बी हार्डिंग, हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी, सेवासदन प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला यासह तब्बल १२ शाळा-महाविद्यालयांनी या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. ही मानवी साखळी केवळ एक आंदोलन नव्हते, तर भावी पिढीचा ठाम संदेश होता, ‘डीजे हटल्याशिवाय थांबणार नाही!’
पुतळ्यांना अभिवादन करून साखळीचा प्रारंभ
सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व चार हुतात्मे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवी साखळीस प्रारंभ झाला. सात रस्त्यापासून चार हुतात्मा पुतळ्यापर्यंत मानवी साखळी उभी राहिली. रंगभवन, डफरीन चौक, आंबेडकर चौक या मार्गावरून गेलेली ही साखळी शिस्तबद्ध होती. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमधील स्वयंशिस्तही दिसून आली.
घोषणांनी दुमदुमले रस्ते
“डीजे मुक्त सोलापूर झालेच पाहिजे”, “ढोल-ताशांचा गजर करा, डीजे बंद करा” असे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये होते. एक ते दीड या वेळेत मानवी साखळीमुळे सात रस्ता परिसरापासून चार हुतात्मा पुतळ्यापर्यंतचा परिसर दणाणून गेला होता. पावसातही विद्यार्थ्यांची जिद्द आणि शिस्त पाहून नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. “आमच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि पर्यावरणावर डीजेचे गंभीर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे आता आवाजाच्या या दहशतीला पूर्णविराम हवा. परंपरेचा आनंद आम्ही ढोल-ताशांच्या गजरात साजरा करू, पण डीजे नको” असे विद्यार्थ्यांचे ठाम म्हणणे होते.
पावसातही विद्यार्थ्यांचा जोश
सोलापूर शहरात गुरुवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. तरीदेखील दुपारी तब्बल दोन हजार विद्यार्थी पावसात रस्त्यावर उतरले होते. यावेळी विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करत होते. तर काहींनी हातामध्ये डीजेविरोधी फलक उंचावत सहभाग नोंदवला होता. पावसात उभारून डीजेमुक्तीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लोक कुतुहलाने पहात होते.