सगळ्या नेत्यांशी उत्तम संबंध असलेले आणि एखाद्या मुद्द्यावरून कोणामध्ये मतभेदाचे वातावरण तयार झाल्यास ते निवळण्याचे काम करणारे जे हक्काचे नेते होते, त्यात जवाहरबाबूजी एक होते. बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचं स्मरण...
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
महाराष्ट्रात आज अनेक महत्त्वाची शहरं आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर, म्हणजे औरंगाबादचाही समावेश आहे. शहरं मोठी, महत्त्वाची होतात त्यामागं काही लोकांची दृष्टी असते, कष्ट असतात. तशी छत्रपती संभाजीनगर शहराच्या जडणघडणीमागे कै. जवाहरबाबूजींची दूरदृष्टी आहे.
मुळात प्रत्येक शहराचा पोत वेगळा असतो. त्या त्या शहराचं हवा-पाणी-संसाधनं या सगळ्याचा विचार करून त्या शहराच्या विकासाचं नियोजन करावं लागतं. अशी समज बाबूजींकडं होती. विशेष म्हणजे, त्यांची समज केवळ शहरापुरती मर्यादित नव्हती, तर ती संपूर्ण राज्य किंबहुना त्याहूनही व्यापक स्वरूपाची होती. मी नेहमी सांगतो, की नागपूरजवळ बुटीबोरी ही औद्योगिक वसाहत वसवण्याचं काम बाबूजी उद्योगमंत्री असताना झालं.
मात्र, त्यांच्याच मंत्रिपदाच्या काळात नाशिक, छत्रपती संभाजीनगर या शहरांनाही उद्योगस्नेही बनवण्याची सुरवात झाली. आजघडीला शेकडो उद्योग छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीत येताहेत, याची पायाभरणी बाबूजींनी केली आहे हे आताच्या पिढीला मुद्दाम सांगितले पाहिजे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे एकाहून एक सरस नेते होते. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, बॅरिस्टर अंतुले, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशी अनेक नावं घेता येतील. मात्र, या सगळ्यांशी उत्तम संबंध असलेले आणि यांच्यात एखाद्या मुद्द्यावरून मतभेदाचं वातावरण तयार झालं, तर ते निवळण्याचं काम करणारे जी एक-दोन हक्काची माणसं होती त्यात जवाहरबाबूजी एक होते. त्यांचा स्वभाव, त्यांची कामाची पद्धत आणि त्यांचं एकूण व्यक्तिमत्त्व यामुळे काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांच्या शब्दाला वजन होतं. त्यामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी टाळत नसे.
माझ्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यावेळी आमचा जवळचा संबंध आलाच, पण माझ्या आधीच्या मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या खात्याच्या अनेक मंत्र्यांशी त्यांचं जवळचं नातं होतं. मी काही कामं घेऊन तिथं गेलो, की जवाहरबाबू तिथं बसलेले असायचे. हे स्थान त्यांना सहजी मिळालेलं होतं. जवाहरबाबूंचं नाव समाजकारणी, राजकारणी, वृत्तपत्र संस्थापक आणि एक सहृदयी माणूस म्हणून इतिहासावर नक्की कोरलं जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.