Sharad pawar
Sharad pawar esakal
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांचा सोलापूर दौरा राजकारणाला नवी दिशा देणारा

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नंतर जनरेट्यामुळे तो मागे घेतला. या घडामोडींनंतर प्रथमच आज (ता. ७) श्री. पवार हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बायोसीएनजी प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत. विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके आणि सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्याशी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे मतभेद वाढलेले असताना, होत असलेला पवारांचा दौरा अभिजित पाटलांना निश्चितच बळ देणारा तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या आगामी राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे, हे निश्चित.

शरद पवार हे आमदार रोहित पवार यांच्यासह श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उद्या (रविवारी) सकाळी नऊ वाजता शेतकरी मेळाव्यासाठी येत आहेत. विठ्ठल कारखाना स्थापनेपासून श्री. पवार यांचे या कारखान्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. या कारखान्याला अनेक वेळा श्री. पवार यांनी आवश्यक मदत केली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष (कै.) औदुंबरअण्णा पाटील आणि त्यानंतर (कै.) भारत भालके यांनी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केले.

दरम्यान, कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले आणि अभिजित पाटील यांच्याकडे कारखान्याची धुरा आली. वेगवेगळ्या ठिकाणचे चार साखर कारखाने व्यवस्थित चालवण्याचा अनुभव असलेल्या अभिजित पाटलांनी दोन वर्षे बंद असलेला विठ्ठल कारखानाही सुरू करून तब्बल सात लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप करून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवेळी श्री विठ्ठल परिवारातील भगीरथ भालके, कल्याणराव काळे आणि अभिजित पाटील या तिन्ही नेत्यांची बैठक झाली. परंतु त्यामध्ये एकमत झाले नाही. त्यानंतर त्यांच्यातील मतभेद आणखी वाढल्याचे दिसत आहे. श्री विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर अभिजित पाटील यांचा आत्मविश्वास वाढलाय. आता त्यांनी कल्याणराव काळे यांच्या विरोधात सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलीय. या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांच्या निमंत्रणावरून शरद पवार हे आमदार रोहित पवार यांच्यासह श्री विठ्ठल कारखान्यावर येत आहेत.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत आमदार व्हायचेच, या जिद्दीने काम सुरू केले आहे. वेगवेगळ्या निमित्ताने जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करून अभिजित पाटील हे लोकसंपर्क वाढवत आहेत. परिचारक यांच्या विरोधात विठ्ठल परिवाराचे नेतृत्व आपण खंबीरपणे करू शकतो, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतानाच शरद पवार आणि रोहित पवार हे विठ्ठल कारखान्यावर येत आहेत. त्यामुळे पवारांचा हा दौरा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या आगामी राजकारणाला दिशा देणारा ठरणार आहे, हे निश्चित.

आलात तर तुमच्या सोबत अन्‌...

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर अभिजित पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी पालकमंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह सुमारे साठ नेत्यांची नावे छापली आहेत. परंतु संस्थापक (कै.) औदुंबरअण्णा पाटील आणि ज्यांनी पंधरा वर्षे कारखान्याचे नेतृत्व केले ते कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी आमदार (कै.) भारत भालके यांचे फोटो छापलेले नाहीत. भगीरथ भालके व कल्याणराव काळे या नेत्यांनाही त्यांनी निमंत्रण पत्रिकेत स्थान दिलेले नाही. एकप्रकारे अभिजित पाटील यांनी भगीरथ भालके व कल्याणराव काळे यांना ‘आलात तर तुमच्या सोबत आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय आपण काम करू शकतो’ असा मेसेजच दिला असल्याचे दिसत आहे.

बायोसीएनजी निर्मिती करणारा जिल्ह्यातील पहिला कारखाना

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात उभारण्यात येत असलेला बायोसीएनजी प्रकल्प हा जिल्ह्यातील असा पहिलाच प्रकल्प आहे. बायोसीएनजी ही जगाची गरज आहे. विठ्ठल कारखान्यातील प्रेसमडवर प्रक्रिया करून बायोसीएनजीची निर्मिती केली जाईल. सहा टन बायोसीएनजीची निर्मिती होईल. काही परदेशी कंपन्यांशी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टायअप करून दिले. त्यामुळे श्री विठ्ठल कारखान्याला सत्तांतरानंतर एक वर्षाच्या आत हा मोठा प्रकल्प मिळत आहे. शेतकऱ्यांच्या उसाला या प्रकल्पामुळे जादा दर देणे शक्य होईल आणि कारखान्यालाही मदत होईल.

राज्यात दहा ठिकाणी अशा प्रकारे बायोसीएनजी प्रकल्प उभा राहात आहे. सुमारे शंभर कामगारांना या प्रकल्पामध्ये रोजगार मिळेल. सुरवातीस या प्रकल्पातून सुमारे ७० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. भविष्यात विठ्ठल कारखान्यात स्पेंट वॉशवर देखील बायोसीएनजीची निर्मिती करता येईल. कारखान्यातील घाण पाण्यापासून हायड्रोजन गॅसची निर्मिती करण्यासाठी आमची बोलणी सुरू आहे. या माध्यमातून आपल्या भागात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती वाढेल, असा विश्वास अभिजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT