सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या निमित्ताने गतवर्षी जानेवारी महिन्यात तीन चिमुकल्यांना घेऊन हातावरील पोट असलेले राजस्थानातील कुटुंब फुगे विक्रीसाठी सोलापुरात आले होते. सर्वकाही सुरळीत असतानाच एकेदिवशी अचानक १०-१२ वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली. तेव्हापासून पोलिसांना तपास सुरूच असून अद्याप तपासाला यश आले नाही.
ऑपरेशन मुस्कान-१३ अंतर्गत शहर पोलिसांनी अनेक बेपत्ता मुले, महिला, पुरुषांचा यशस्वीपणे तपास केला. त्यात घरातून निघून गेलेल्यांचाही समावेश आहे. पण, मागच्या वर्षी जानेवारीत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतून बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा तपास अद्याप लागलेला नाही. फुगे विक्री करणारी १०-१२ वर्षांची ‘ती’ चिमुकली आईच्या डोळ्याआड गेली आणि काही क्षणात ती दिसेनाशी झाली. आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारात वाहत होत्या, तशात ती आपल्या पोटच्या गोळ्याला शोधत होती. मात्र, ती कोठे गायब झाली पुन्हा दिसलीच नाही. त्यानंतर त्या चिमुकलीच्या आई-वडिलांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले, फिर्याद दिली.
पोलिसांनी इकडे-तिकडे शोधाशोध केली, पण त्यांनाही ती सापडली नाही. आता शेवटी तो तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविला आहे. त्यांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनपर्यंत यश आलेले नाही. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पुण्यासह सोलापूरच्या जवळील जिल्ह्यांमध्ये शोधाशोध केली. याशिवाय राज्यातील सर्वच चाईल्ड लाईनला कळविले, रेल्वे स्थानकांवर पोस्टर लावले, ‘सीसीटीएनएस’द्वारे सर्व पोलिस ठाण्यांना कळविले, पोलिस पाटलांच्या व्हॉट्सॲप ग्रूपवरही माहिती पाठविली, मात्र अद्याप ती चिमुकली पोलिसांना सापडली नाही.
सरपंच भाभीचाही शेवटपर्यंत लागला नाही तपास
सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कवठे गावच्या तत्कालीन सरपंच जैतुनबी शेख या भर दिवसा शेळ्या राखायला घेऊन गेल्यावर अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर श्वान पथक, गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांनी शोध घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत. अनेक ठिकाणी शोध घेतला, गावात विचारपूस केली, त्या सरपंच भाभींच्या कुटुंबियांची चौकशी केली. तरीदेखील त्या शेवटपर्यंत सापडल्याच नाहीत. आजही गावकऱ्यांना गावच्या सरपंचभाभी नेमक्या गेल्या कोठे, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही.
पोलिस म्हणतात, नातेवाईकांना बोलावूनही ते येत नाहीत
रेल्वे स्टेशन, एसटी स्थानक, चाईल्ड लाईन, पोलिस ठाण्यांसह इतरत्र शोध घेऊनही ती चिमुकली सापडली नाही. त्यामुळे आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी त्या चिमुकलीच्या पालकांना त्यांच्या नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी बोलावले आहे. अनेकदा निरोप देऊनही ते आले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.