सोलापूर : येथील सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षिकेचा विनयभंग केला. जुलै २०२४ ते १९ जानेवारी २०२६ या काळात मुख्याध्यापकाने वारंवार सांगूनही छळ सुरूच ठेवला. त्याच्या सततच्या त्रासाला वैगातून शिक्षकेने पोलिसांत धाव घेतली. लैगिंक छळ तथा विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एम. डी. बिराजदार असे त्या संशयित आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.
फिर्यादी १३ वर्षांपासून त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दहा वर्षे त्या शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर काम केले आणि आता त्यांना ४० टक्के वेतन मंजूर आहे. त्या शाळेतील मुख्याध्यापक देखील १३ वर्षांपूर्वीच नेमणूक झालेला आहे. जुलै २०२४ मध्ये त्या मुख्याध्यापकाने चुकीच्या व वाईट नजरेतून पाहून अश्लिल हावभाव करायला सुरवात केली.
सहा महिन्यांपूर्वी त्याने मोबाईलवरील स्टेट्सवर पतीसोबत ठेवलेला फोटो पाहून ‘तुम्ही खूप छान दिसता, नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका साडीवरील एकटीचा फोटो ठेवा’ अशी टिप्पणी केली. त्यावेळी फिर्यादी शिक्षिकेने मुख्याध्यापकास वैयक्तिक आयुष्यावर आपण काहीही बोलू नका, असे बजावले होते. त्यानंतर सुद्धा त्याच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. घरी गेल्यावर तो मेसेज, व्हिडिओ कॉल करीत होता. त्यांना एकदा वैयक्तिक मेसेज पाठवू नका, अशी विनंती केली होती. तरीपण, बिराजदारने फिर्यादीला व्हिडिओ कॉल करून अश्लिल हावभाव केले, असेही फिर्यादीत नमूद आहे. दाखल गुन्ह्याचा सहायक पोलिस निरीक्षक अनिल राजगुरू तपास करीत आहेत.
नंबर ब्लॉक केला, तरीपण...
मुख्याध्यापकाच्या त्रासाला वैतागून पीडितेने त्याचा नंबर ब्लॉक केला. तरीदेखील त्याने १७ एप्रिल २०२५ रोजी कन्नड भाषेतील लैंगिक ताकद कशी वाढते, याचा व्हिडिओ टाकला. फोनवर मी प्रतिसाद देत नसल्याने त्याने लेक्चर ऑफ असताना एकटीला केबिनमध्ये बोलावून घेऊन हात धरून ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’ म्हणून लगट करण्याचा प्रयत्न केला. घरी गेल्यावर अस्वस्थ पाहून पतीने विचारणा केली. त्यांना सगळे सांगितल्यावर त्यांनी मुख्याध्यापकास फोन केला, पण त्यांनी दाद दिली नाही. मुख्याध्यापकास मी शाळेत जाऊन विचारणा केल्यावर त्याने नोकरी घालवतो, सेवापुस्तिका खराब करतो, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.