solapur airport
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर विमानतळ परिसरात ड्रोन आणि पतंग उडविणे बंद झाले असले, तरी मोकाट कुत्र्यांचा वावर अद्यापही कायम आहे. काही वेळा ही कुत्री विमानतळाच्या रन-वेवर देखील दिसून आली आहेत. या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्रे आणि पक्ष्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. विमानतळाच्या भिंतीलगत राहणाऱ्या १४४ कुटुंबांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
विमानतळाच्या परिसरात गवत वाढले आहे. भिंतीलगतचे रहिवासी शिळे अन्न, मासांचे तुकडे आतील भागात टाकतात. तेथील ड्रेनेजही उघडे आहे. त्यामुळे कुत्री भिंतीलगतच्या घरांवरून, स्वच्छतागृहांवरून उडी घेऊन विमानतळ परिसरात शिरतात. त्यांना पुन्हा सहजासहजी बाहेर पडता येत नसल्याने ती कुत्री आतील परिसरात वावरतात. विमानतळाच्या सुरक्षेसाठी नेमलेले कर्मचारी अशा कुत्र्यांना बाहेर हाकलण्याचे काम करतात.
दरम्यान, भिंतीलगचे अतिक्रमण काढायचे कोणी? यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले आहे. ती जागा विमानतळ प्राधिकरणाच्या नावे असल्याने त्यांनीच अतिक्रमण काढून घ्यावे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भिंतीलगतचे अतिक्रमण हटविल्याशिवाय विमानतळ परिसरातील मोकाट कुत्र्यांचा वावर कमी होणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. तुर्तास, विमान येण्यापूर्वी परिसरात पक्षी असणार नाहीत, यासाठी मोठ्या आवाजाचे फटाके उडविले जातात. त्या आवाजामुळे कुत्रीही ‘रन-वे’जवळ येऊ नयेत हा हेतू आहे. विमानसेवा विनाअडथळा सुरु रहावी, कोणताही अडसर त्यासाठी नको, या पार्श्वभूमीवर सर्वांनी मिळून यासंदर्भात कार्यवाही करणे अपेक्षित असल्याच्या भावना सोलापूरकरांच्या आहेत.
लोकसंख्येच्या साडेचार टक्के भटकी कुत्री
सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांपर्यंत आहे. एकूण लोकसंख्येच्या साडेचार टक्के भटकी कुत्री शहरात असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले. या कुत्र्यांना पकडण्यासाठी सध्या महापालिकेकडे दोनच गाड्या आहेत. त्यातही एक गाडी अत्यावश्यक कामासाठी आहे. शहरातील कुत्र्यांची संख्या २०२३ मध्ये ३६ ते ४० हजारांपर्यंत होती. दोन वर्षांत त्यात तीन ते चार हजारांची भर पडली आहे.
३ महिन्यांत विमानतळ परिसरातून पकडली ४० कुत्री पकडली
विमानतळ परिसरात वावरणारी तब्बल ४० कुत्री मागील तीन महिन्यांत पकडल्याचे महापालिकेच्या पशुसंर्वधन अधिकाऱ्यांनी सांगितले. कुत्री विमानतळ परिसरात का येतात, यासंदर्भात विमानतळ व्यवस्थापकांना दोनदा पत्रे देखील दिल्याचे ते म्हणाले. महापालिकेने हा प्रश्न सुटावा म्हणून दोन शिफ्टमध्ये आरोग्य निरीक्षक व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांची गस्त सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.