Ajit Pawar NCP Politics : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद-भावजयीच्या लढतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. बारामतीच्या जनतेने अजित पवारांपेक्षा काका शरद पवारांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी दिली. अजित पवारांचा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय मतदारांना आवडला नाही, असंही राजकीय जाणकार सांगतात.
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीत ५ लाख ७३ हजार ९७९ मतं मिळाली तर विजयी झालेल्या सुप्रिया सुळे यांना ७ लाख ३२ हजार ३१२ मतं मिळाली. १ लाख ५८ हजार ३३३ एवढं मताधिक्य घेऊन सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय झाला.
देशामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी घटकपक्षांच्या साथीने भाजपने देशामध्ये सत्तेची सूत्रं हाती घेतली आहेत. राज्यामध्ये लोकसभेच्या ४८ जागांपैकी केवळ १७ जागांवर एनडीए तर ३० जागांवर इंडिया आघाडीला यश मिळालं आहे.
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला उणीपुरी एक जागा मिळू शकली. तीही त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची. रविवारी केंद्रामध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद मिळालं नाही. यावर खुलासा करताना अजित पवारांनी कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे होतं वगैरे कारण दिलं आहे. पण मुळात अजित पवारांना भाजपला मंत्रिपद द्यायचं होतं का? जरी द्यायचं असलं तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातल्या अंतर्गत संघर्षामुळे ते मिळालं नाही का? असा प्रश्न राजकीय जाणकार उपस्थित करीत आहेत.
मुद्दा आहे, सुनेत्रा पवारांच्या खासदारकीचा. लोकसभेला पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. गुरुवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रफुल्ल पटेल यांना काही महिन्यांपूर्वी नव्याने राज्यसभा मिळाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना त्यांच्याजागी संधी मिळाली आहे.
पार्थ पवारांना डावलून सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देण्यामागे अजित पवारांची राजकीय खेळी काय असू शकते? यासंदर्भात प्रतिक्रिया देताना 'सकाळ'चे राजकीय संपादक विजय चोरमारे म्हणतात, या निर्णयामागे अजित पवारांची राजकीय प्रगल्भती दिसून येत नाही. हा निर्णय केवळ भावनिक पातळीवर घेतल्याचं दिसून येतंय.
''अजित पवारांच्या या निर्णयाकडे आपण तटस्थपणे बघितलं, तर लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरची प्रतिक्रिया म्हणून घेतलेला आजचा निर्णय आहे, असं वाटतं.. यामध्ये कोणतीही दूरदृष्टी दिसून येत नाही.'' असंही चोरमारे म्हणाले.
संपादक विजय चोरमारे पुढे सांगतात, अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्याऐवजी पार्थ पवार यांना जर राज्यसभेची संधी दिली असती तर त्यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली असती, पर्यायाने त्यांची पक्षाला मदत होऊ शकली असती. कारण २०१९नंतर पाच वर्षे झाली तरी पार्थ पवार हे राजकारणात उभे राहू शकलेले नाहीत, ही संधी अजित पवारांनी गमावली आहे.
लोकसभेच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली साताऱ्याची जागा अजित पवारांनी भाजपसाठी सोडली. भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून विजयी झाले. साताऱ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला.
लोकसभेच्या प्रचारादरम्यान साताऱ्यामध्ये बोलताना अजित पवारांनी साताऱ्याला राज्यसभेवर संधी मिळेल, असं विधान केलं होतं. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याबाबत त्यांनी शब्द दिला होता. परंतु अजित पवार म्हणत असलेले ती जागा उदयनराजे यांची आहे. ती जागा नितीन पाटील यांना भविष्यात मिळू शकते. नितीन पाटलांची जागा सुनेत्रा पवारांना दिली, अशी चुकीची मांडणी सध्या सुरु आहे. सुनेत्रा पवारांना मिळालेली राज्यसभा ही प्रफुल्ल पटेलांमुळे रिक्त झालेली आहे, असं स्पष्टीकरण विजय चोरमारे यांनी दिलं.
सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेमुळे बारामतीला तीन-तीन खासदार मिळणार आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. पुढे जाऊन सुनेत्रा पवारांना केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिपद मिळेल, असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर केंद्राचा निधी पुणे, बारामती परिसरात आणून अजित पवारांना पक्षसंघटन मजबूत करता येणार आहे.
केंद्रीय मंत्रिपदाची संधी सुनेत्रा पवारांना मिळाली तर पक्षावरचं कथित आणि संभाव्य गटातटाचं संकट दूर करता येईल. याशिवाय लोकसभा निवडणुकीत राज्यभरामध्ये पक्षाला जे पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं, त्यातून सावरण्याची आणि प्रतिमा सुधारण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. राज्यभरात शरद पवार गटाची जी 'क्रेझ' निकालानंतर निर्माण झाली आहे, त्याला मंत्रिपदाच्या माध्यमातून रोख लावण्याचं काम 'एनडीए'ला करता येईल. याशिवाय कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल, हे वेगळंच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.