तात्या लांडगे
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना आता ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. या मुदतीत शिक्षकांना ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याच्या तब्बल दहा संधी उपलब्ध असणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील (इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत) तब्बल दहा हजार १८९ तर राज्यभरातील पावणेदोन लाख शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाहीत. त्यातील ७० टक्क्यांहून अधिक शिक्षकांचे वय ४२ ते ५० वर्षांपर्यंत आहे. मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सक्तीने सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आठ हजार ६०० शिक्षकांपैकी अवघे दीड हजार शिक्षकच पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत. महाराष्ट्र शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक केली. पण, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे, त्यांना ही पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे उतारवयातील शिक्षकांनाही परीक्षेचा अभ्यास करावाच लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दरवर्षी दोनदा ‘टीईटी’ घेण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये पहिली आणि डिसेंबरअखेर दुसरी ‘टीईटी’ होते. दुसरीकडे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फतही वर्षातून दोनदा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत शिक्षकांना ‘टीईटी’च्या १० संधी मिळणार आहेत.
‘टीईटी’साठी आता वरिष्ठांच्या परवानगीची आवश्यकता नाही
सोलापूर जिल्हा परिषदेतील सुमारे साडेआठ हजार शिक्षकांपैकी दीड हजार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण आहेत. बाकीच्या शिक्षकांना (वय ५३ वर्षे असलेले सगळे शिक्षक) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. त्याशिवाय पदोन्नती देखील मिळणार नाही. दरम्यान, शिक्षकांना आता ‘टीईटी’ला बसण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या मान्यतेची आवश्यकता असणार नाही. शिक्षक थेट पात्रता परीक्षा देऊ शकतात.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
शाळांचे मुख्याध्यापक राहणार प्रभारी
‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नतीचा लाभ घेता येणार आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी सोलापूर जिल्हा परिषदेने २०० हून अधिक शाळांमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक नियुक्त केले होते. आता यापुढे सेवाज्येष्ठतेसोबतच ‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांनाच मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळणार आहे. सध्या उतारवयातील शिक्षक ‘टीईटी’ उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आगामी काळात शेकडो शाळांचे मुख्याध्यापक प्रभारीच नेमावे लागणार आहेत.
सोलापूर झेडपी शाळांची स्थिती
एकूण शाळा
२,७६८
कार्यरत शिक्षक
८,६००
‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षक
१,५०२
प्रभारी मुख्याध्यापक
५३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.