solapur
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा उद्यापासून (शुक्रवार) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पुणे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी सोलापूर शहर-जिल्ह्यातील ५०० हून अधिक मुख्याध्यापकांना बोर्डाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाहीत, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. गैरप्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्याचवेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचे २ ते १८ फेब्रुवारी दरम्यान प्रात्यक्षिक पार पडेल. बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होईल. दरम्यान, सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी आहे. यासाठी माध्यमिक शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी आल्याने प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायला अडचणी येत असल्याची खंत मुख्याध्यापकांनी बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडली.
मुख्याध्यापकांची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांपुढे मांडून मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी श्री. उकिरडे यांनी दिली. यावेळी परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेरे, भरारी पथके, बैठे पथके, कस्टडी, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वाटप, अंगझडतीचे नियोजन, अशा बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, पुणे विभागाच्या सचिवा मिनाक्षी राऊत आदी उपस्थित होते.
शिक्षण अन् महसूलची भरारी पथके
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कॉपीमुक्त पार पडेल. त्यासाठी आता जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता शिक्षण विभागाच्या जोडीला जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजेच महसूल विभागाचीही भरारी पथके परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देतील, असेही श्री. उकिरडे यांनी यावेळी सांगितले.