Teacher payment and e-kyc
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्यभरातील खासगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-केवायसी’ बंधनकारक करण्यात आली आहे. आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांची ‘ई-केवायसी’ राहिलेली आहे. आता शालार्थ प्रणालीवर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शेवटची मुदत देण्यात आली आहे. यांनी आता २० सप्टेंबरपूर्वी ‘ई-केवायसी’ करायची आहे, अन्यथा ऑक्टोबरपासून त्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद होणार आहे.
शिक्षण संचालनालयाने शालार्थ प्रणालीवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विभागनिहाय ‘ई-केवायसी’चा आढावा घेतला. यावेळी या प्रक्रियेस काहीसा अधिक वेळ लागत असल्याच्या तक्रारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करत होते. या पार्श्वभूमीवर त्या सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त आदेश काढून ‘ई-केवायसी’साठी शेवटची मुदतवाढ दिली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने या मुदतवाढीसोबतच एक कडक इशाराही दिला आहे. त्यानुसार २० सप्टेंबरपर्यंत ज्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ‘ई-केवायसी’ पूर्ण होणार नाही, त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबरमध्ये मिळणारे वेतन वेतन रोखले जाणार आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांनी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना तत्काळ सूचना द्याव्यात आणि मुदतीत ‘ई-केवायसी’ पूर्ण करून घ्यावी, असेही आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. मुदतीनंतर ‘ई-केवायसी’ न केलेल्या शिक्षकांचे पगारबिलच अपलोड होणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.
आता यापुढे मुदतवाढ नाहीच
राज्यातील विविध जिल्ह्यातील शालार्थ आयडीतील घोटाळे समोर आले आहेत. यानंतर शासनाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शालार्थ प्रणालीवर ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याचे बंधन घातले. त्यानंतरही अनेकांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही, अनेकांच्या त्रुटी राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यासाठी शिक्षण संचालकांनी शेवटची मुदत दिली आहे. यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही संचालकांनी स्पष्ट केले आहे.
सर्वांनी मुदतीत प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
वारंवार मुदतवाढ देऊनही शालार्थ प्रणालीवरील अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘ई-केवायसी’ केलेली नाही. त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून मुदतीत त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.
- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक शिक्षण, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.