पंढरपूर चंद्रभागा नदी

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

४१५० कोटींचा पंढरपूर कॉरिडॉर! संतांच्या विचारांवर आधारित डिजिटल संतसंग्रहालय, अभंगांचा इतिहास अन्‌ त्यामागील जीवनदृष्टी अनुभवता येईल अशी अभंग ऑडिओ गॅलरी असावी, सविस्तर वाचा...

कॉरिडॉरमध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, एकनाथ, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार अशा संतांच्या विचारांवर आधारित डिजिटल संतसंग्रहालय असावे. अभंगांचा इतिहास आणि त्यामागील जीवनदृष्टी अनुभवता येईल अशी अभंग ऑडिओ गॅलरी असावी. वारकरी संप्रदायाची आठशे वर्षांची परंपरा सांगणारे वारी अनुभवकेंद्र असावे. युवकांसाठी संतसाहित्य संशोधन वाचनालय आणि आधुनिक संदर्भात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध यांचा अभ्यास करणारे संशोधन केंद्र असावे.

सकाळ डिजिटल टीम

सिद्धाराम पाटील, सहयोगी संपादक (सकाळ, सोलापूर)

सोलापूर : पंढरपूर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीचा, श्रद्धेचा आणि समतेच्या परंपरेचा अखंड प्रवाह. या प्रवाहाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे चार हजार १५० कोटी रुपयांचा पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक दशके गर्दी, वाहतूक, अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा आणि अनियोजनामुळे वारकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प स्वागतार्ह आहे. परंतु, या निमित्ताने एक मूलभूत प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे; ‘कॉरिडॉर’ म्हणजे नेमके काय?

आज देशात काशी, उज्जैन, अयोध्या, मथुरा किंवा इतर तीर्थक्षेत्रांचा उल्लेख झाला की ‘कॉरिडॉर’ हा शब्द अपरिहार्यपणे समोर येतो. कुठे त्याचे स्वागत होते, तर कुठे जमीन अधिग्रहण, स्थानिक हितसंबंध किंवा पारंपरिक रचनेतील बदल यामुळे विरोधही होतो. पंढरपूरही त्याला अपवाद नाही. कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पात विरोधाचे अनेक पैलू असतात. काही आक्षेप रास्त असतात, काही वैयक्तिक हितसंबंधांशी निगडित असतात. मात्र, केवळ विरोध होतो म्हणून विकास थांबता कामा नये. उलट विकासाचा आशय अधिक व्यापक आणि लोकाभिमुख कसा होईल, यावर व्यापक चर्चा होणे अधिक आवश्यक आहे. पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भातही नेमका हाच प्रश्न आहे. चर्चा प्रामुख्याने रस्ते, पार्किंग, वाहतूक, दर्शनरांगा, नदीकाठ, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांपुरती मर्यादित राहिलेली दिसते. या सर्व गोष्टी आवश्यकच आहेत; पण एवढाच कॉरिडॉरचा अर्थ आहे का? की त्यापलीकडेही काही आहे? हा प्रश्न समजून घेण्यासाठी एका वेगळ्या उदाहरणाचा आधार घेता येईल. आज योगाची लोकप्रियता जगभर वाढली आहे. लाखो लोक योग करतात. अनेकांसाठी योग म्हणजे शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा उत्तम व्यायाम. यात काही चुकीचे नाही; उलट शरीर निरोगी राहणे ही योगाची महत्त्वाची देणगी आहे. पण योगाचा उद्देश केवळ शरीरसुदृढता आहे का? भारतीय तत्त्वज्ञान त्याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे देते. योग म्हणजे मन, बुद्धी, भावना आणि चेतना यांचा समतोल साधण्याची प्रक्रिया. शरीर निरोगी ठेवणे हा त्याचा केवळ एक परिणाम आहे; अंतिम उद्देश नाही. जर योगाला केवळ शारीरिक कसरतींपुरते मर्यादित केले, तर त्यातील सर्वांत मौल्यवान आध्यात्मिक आणि मानवी पैलू हरवून जातात.

कॉरिडॉरच्या संकल्पनेचेही काहीसे असेच झालेले दिसते. गर्दी व्यवस्थापन आवश्यक आहे, सुरक्षितता आवश्यक आहे, आधुनिक सुविधा आवश्यक आहेत; परंतु तीर्थक्षेत्राचा विकास एवढ्यापुरताच मर्यादित राहिला, तर आपण मंदिराच्या मूळ उद्देशालाच विसरू. मंदिर म्हणजे केवळ दर्शन घेण्याचे ठिकाण नाही. ते भारतीय समाजाच्या सांस्कृतिक स्मृतीचे केंद्र आहे. ते श्रद्धेचे केंद्र आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते मानवी जीवनाला दिशा देणारे केंद्र आहे. भारतीय समाजात हजारो वर्षे मंदिरांनी केवळ धार्मिक विधी घडवून आणले नाहीत; त्यांनी शिक्षण दिले, कला जोपासली, समाजजीवन घडवले, लोकांना एकत्र आणले आणि जीवनमूल्यांचे संवर्धन केले. म्हणूनच मंदिरांचा विचार केवळ पर्यटनाच्या चष्म्यातून करता येत नाही. निश्चितच, मोठ्या तीर्थक्षेत्रांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळते. व्यापारी व्यवहार वाढतात. रोजगार निर्माण होतो. पर्यटनाला चालना मिळते. या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. परंतु, जर मंदिरांच्या विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ आर्थिक राहिला, तर ती आपल्या सांस्कृतिक वारशाची घोर विडंबना ठरेल. कारण, मंदिरांचे सर्वांत मोठे योगदान अर्थव्यवस्थेत नाही, तर माणूस घडवण्यात आहे. भारतीय संतपरंपरेने मंदिरांना लोकशिक्षणाची केंद्रे बनवली. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील गीता लोकभाषेत आणली. तुकारामांनी अभंगातून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. संत नामदेवांनी भक्तीला सामाजिक आशय दिला. संत चोखामेळा यांनी समतेचा संदेश दिला. जनाबाईंनी श्रमाला अध्यात्माची जोड दिली. या सर्व संतांनी मंदिराभोवती समाजाची नैतिक आणि आध्यात्मिक पुनर्रचनाच घडवून आणली. आज आपण उभारत असलेला कॉरिडॉर या परंपरेला पुढे नेणारा आहे का, हा प्रश्न विचारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कारण, मंदिरे केवळ श्रद्धेवर टिकलेली नाहीत; ती मानवी मनाच्या एका खोल गरजेवर उभी आहेत; ही गरज म्हणजे आशा. विविध धर्मांचे गाढे अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माविषयी बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडला आहे. ते म्हणतात, ‘धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडितांना आहे. गरीब माणूस आशेवर जगतो. धर्म त्याला सांगतो - घाबरू नकोस; जीवन आशावादी होईल.’ या विचाराकडे केवळ धार्मिक विधान म्हणून पाहता कामा नये. मानवी मानसशास्त्र समजून घेणारा हा अत्यंत गहन दृष्टिकोन आहे. संकटात असलेला मनुष्य आधार शोधतो. जीवनाला अर्थ देणारी शक्ती शोधतो. मंदिरे त्या आशेचे सामाजिक रूप बनतात.

याच कारणामुळे हजारो वर्षांच्या इतिहासात असंख्य आक्रमणे झाली, मंदिरे उद्ध्वस्त झाली, राजवटी बदलल्या; पण मंदिरव्यवस्था नष्ट झाली नाही. ती पुन्हा उभी राहिली. पुन्हा शिखरे उभारली गेली. पुन्हा ध्वज फडकले. कारण, मंदिरे ही केवळ दगडांची रचना नव्हती; ती समाजाच्या मनात उभी होती. आजही कोणत्याही गावात दोन-चार घरे उभी राहिली की मंदिर उभे राहते. प्रत्येक घरात देवघर असते. पर्वतावर, अरण्यात, समुद्रकिनारी, वाळवंटात... जिथे माणूस गेला, तिथे मंदिर उभे राहिले. हा योगायोग नाही; ही भारतीय संस्कृतीची जीवनदृष्टी आहे. या जीवनदृष्टीचा विचार न करता जर आपण कॉरिडॉर उभारला, तर तो केवळ भव्य वास्तूंचा प्रकल्प राहील; संस्कृतीचा नाही. म्हणूनच पंढरपूर कॉरिडॉरचा विचार करताना प्रश्न फक्त एवढाच नसावा की, ‘लाखो वारकऱ्यांना सुलभ दर्शन कसे मिळेल?’ त्यापेक्षा मोठा प्रश्न असा असावा की, पंढरीत येणारा वारकरी परत जाताना अधिक सजग, अधिक समतावादी, अधिक सेवाभावी आणि अधिक आशावादी माणूस बनण्यासाठी आपण काय करणार आहोत? अध्यात्म रोजच्या जगण्यात येण्यासाठी काय करणार आहोत? याच प्रश्नांच्या उत्तरात पंढरपूर कॉरिडॉरचे खरे भवितव्य दडलेले आहे. मंदिर म्हणजे केवळ देवदर्शनाची जागा, असा समज अलीकडच्या काळात रूढ झाला आहे. प्रत्यक्षात भारतीय संस्कृतीत मंदिरांची भूमिका त्यापेक्षा कितीतरी व्यापक राहिली आहे. जगातील अनेक संस्कृती उदयास आल्या, विस्तारल्या आणि काळाच्या ओघात लुप्त झाल्या. साम्राज्ये कोसळली, राजवटी बदलल्या, सीमा बदलल्या; पण भारतीय मंदिरव्यवस्था पाच हजारांहून अधिक वर्षे टिकून राहिली. हा केवळ धार्मिक इतिहास नाही, तर मानवी सभ्यतेच्या इतिहासातील एक विलक्षण अध्याय आहे. हजारो वर्षांपूर्वी लोकसंख्येची घनता आजच्या तुलनेत अत्यल्प होती. आजच्या अर्थाने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक कोंडी किंवा लाखो भाविकांच्या रांगा असे प्रश्न अस्तित्वात नव्हते. तरीही त्या काळातील मंदिरांची भव्यता पाहिली की आपण थक्क होतो. रामेश्वरम्, मदुराई, सुचिंद्रम, कोणार्क, पुरी, वेरूळ येथील कैलास लेणे, अंकोरवाटसारखी मंदिरे केवळ स्थापत्यकलेचे चमत्कार नाहीत; ती भारतीय जीवनदृष्टीची साक्ष आहेत. एक प्रश्न सहज पडतो, ज्या काळात गर्दी नव्हती, त्या काळात इतकी विशाल मंदिरे का उभारली गेली? उत्तर शोधले, तर मंदिराचा मूळ उद्देश समोर येतो.

मंदिरात माणूस काही क्षण दर्शन घेऊन बाहेर पडावा, एवढाच उद्देश नव्हता. उलट तेथे तो थांबावा, शांत व्हावे, चिंतन करावे, ज्ञान घ्यावे, जीवन समजून घ्यावे, समाजाशी जोडले जावे आणि अधिक समृद्ध मनाने परत जावे, हा त्यामागील विचार होता. अनेक मंदिरांभोवती गुरुकुले होती. विद्वानांचे संवाद होत. अनुभूती आणि ज्ञान यांचा संगम घडवणारे ‘अनुभव मंडप’ होते. संगीत, नृत्य, शिल्प, वास्तुशास्त्र, आयुर्वेद, योग, तत्त्वज्ञान, न्याय, व्याकरण अशा विविध विद्यांचे संवर्धन मंदिर परिसरातच होत असे. म्हणजे मंदिरे ही केवळ पूजा करण्याची जागा नव्हती; ती समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र होती. याच दृष्टीने पंढरपूरकडे पाहिले, तर त्याचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. पंढरपूरची ओळख केवळ विठ्ठलाच्या मंदिरामुळे निर्माण झालेली नाही; ती संतांच्या अखंड परंपरेमुळे निर्माण झाली आहे. विठ्ठल हा केंद्रबिंदू असला, तरी पंढरपूरचे वैशिष्ट्य संतांनी घडवलेल्या विचारविश्वात आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान लोकभाषेत आणले. संत नामदेवांनी भक्तीला सीमापार नेले. संत तुकारामांनी अभंगातून सामान्य माणसाला जीवनाचे तत्त्वज्ञान दिले. संत चोखामेळा यांनी समतेचा संदेश दिला. संत जनाबाईंनी श्रमाला भक्तीचे रूप दिले. या सर्वांनी मिळून पंढरपूरला एका मंदिरापेक्षा मोठे बनवले - ते लोकशिक्षणाचे आणि लोकप्रबोधनाचे विद्यापीठ बनले. यामुळेच वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही; ती चालते-बोलते लोकविद्यापीठ आहे. वारकरी चालतो तो फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी नाही. तो सहनशीलता शिकतो. शिस्त शिकतो. सामूहिक जीवन शिकतो. परस्पर सेवा शिकतो. समता अनुभवतो. अभंग गाताना त्याला तत्त्वज्ञान सहज समजते. प्रवचन ऐकताना जीवनाचे प्रश्न समजतात. कीर्तनातून आत्मपरीक्षण घडते. या संपूर्ण प्रक्रियेत माणूस नकळत बदलत जातो. म्हणूनच वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचा सर्वांत मोठा प्रयोग मानला जातो. मग प्रश्न असा आहे, की उद्याचा पंढरपूर कॉरिडॉर या लोकशिक्षणाला अधिक सक्षम करणार आहे का?

आजचा समाज शंभर वर्षांपूर्वीच्या समाजापेक्षा वेगळा आहे. भौतिक सुविधा वाढल्या; पण मानसिक ताणही वाढले. कुटुंबव्यवस्था बदलली. नैराश्य, एकाकीपणा, व्यसनाधीनता, हिंसा, स्पर्धा आणि तुटलेले संवाद या समस्या गंभीर होत आहेत. अशा काळात मंदिरांची गरज कमी झालेली नाही; उलट त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. कारण, माणसाला केवळ सुविधा पुरेशा नसतात; त्याला अर्थपूर्ण जीवनाची दिशाही हवी असते. म्हणूनच पंढरपूर कॉरिडॉरची संकल्पना केवळ पायाभूत सुविधांपुरती मर्यादित राहू नये. कल्पना करा - वारकरी मंदिरात येतो. दर्शन घेतो. बाहेर पडताना त्याला संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई यांच्या विचारांचे आधुनिक सादरीकरण अनुभवायला मिळते. अभंगांचे ध्वनीदालन असते. डिजिटल माध्यमातून संतचरित्रे समजतात. ध्यानासाठी शांत केंद्र असते. युवकांसाठी संतसाहित्य अभ्यासिका असते. वारीचा इतिहास सांगणारे अनुभवकेंद्र असते. कीर्तन आणि प्रवचनासाठी कायमस्वरूपी मुक्त रंगमंच असतो. मुलांसाठी संवादात्मक संस्कार केंद्र असते. पर्यावरण, सेवा आणि समतेवर आधारित उपक्रम चालत असतात. अशा परिसरातून बाहेर पडणारा माणूस केवळ दर्शन घेतलेला भक्त राहात नाही; तो काहीतरी घेऊन घरी परततो. यालाच आपण ‘आध्यात्मिक अनुभव’ म्हणतो. आज अनेकदा दर्शन ही एक प्रक्रिया बनते - रांगेत उभे राहणे, काही सेकंद देवाकडे पाहणे आणि बाहेर पडणे. हे अपरिहार्य असले, तरी ते अपुरे आहे. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रात भक्ताच्या मनात विचारांचे बीज रुजले पाहिजे. संतविचार नकळत मनात उतरले पाहिजेत. हीच कॉरिडॉरची खरी कसोटी ठरेल.

या संदर्भात पंढरपूरचा इतिहासही महत्त्वाचा आहे. परंपरेनुसार आदि शंकराचार्यांनी रचलेले ‘पांडुरंगाष्टक’ विठ्ठल उपासनेची अडीच हजार वर्षांची प्राचीनता अधोरेखित करते. पंढरपूर अनेक शतकांपासून भारतीय भक्तिपरंपरेचे केंद्र राहिले आहे. या परंपरेने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच आजचा प्रश्न केवळ एवढाच नाही की, कॉरिडॉरमध्ये किती मीटर रुंद रस्ता असेल, किती पार्किंग होईल किंवा किती घाट विकसित होतील. प्रश्न असा आहे की, कॉरिडॉरमधून संतविचार पुढील शंभर वर्षे समाजापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था उभी राहणार का? आज आपण शिक्षणासाठी विद्यापीठे उभारतो, संशोधनासाठी संस्था उभारतो, विज्ञानासाठी प्रयोगशाळा उभारतो; मग संतवाङ्‌मयाचा अभ्यास, संशोधन आणि आधुनिक भाष्य करण्यासाठी पंढरपूरमध्ये राष्ट्रीय दर्जाचे केंद्र का असू नये? ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत आणि इतर संतसाहित्य आधुनिक संदर्भात समजावून सांगणारे संशोधन, प्रशिक्षण आणि संवादकेंद्र येथे का उभे राहू नये? कॉरिडॉर म्हणजे फक्त दगड, सिमेंट आणि रस्ते नव्हेत. तो पुढील अनेक पिढ्यांच्या विचारविश्वावर परिणाम करणारा सांस्कृतिक आराखडा असतो. म्हणूनच पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये संतविचारांचा श्वास नसेल, तर तो कितीही भव्य असला तरी अपुरा ठरेल. याच ठिकाणी पंढरपूरला एक मोठी संधी आहे. तीर्थक्षेत्राचा विकास आणि संतपरंपरेचे पुनरुज्जीवन या दोन्ही गोष्टी एकत्र साधण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. ती दृष्टी धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी, वास्तुविशारद, वारकरी संप्रदाय, मठसंस्था, अभ्यासक आणि समाज यांनी एकत्र येऊन विकसित केली, तर पंढरपूरचा कॉरिडॉर केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर जगासाठीही एक आदर्श ठरू शकतो.

अक्षरधाम, उज्जैन आणि शेगावकडून काय शिकायचे?

भारतातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा गेल्या दोन दशकांचा प्रवास पाहिला, तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. श्रद्धेच्या केंद्रांना आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. काशी विश्वनाथ धाम, उज्जैनचा महाकाल लोक, अयोध्येचा विकास आराखडा, मथुरेतील प्रस्तावित बदल या सर्व प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरण आणि भाविकांच्या सोयींना मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. ही दिशा योग्यच आहे. कारण, तीर्थक्षेत्र हे असुविधेचे प्रतीक असण्याचे काहीच कारण नाही. पण या प्रवासात आणखी एक प्रश्न उभा राहतो-विकास म्हणजे नेमके काय? जर विकासाचा अर्थ केवळ रुंद रस्ते, आकर्षक प्रकाशयोजना, दगडी फरसबंदी आणि भव्य प्रवेशद्वारे इतकाच असेल, तर काही वर्षांनी प्रत्येक कॉरिडॉर सारखाच दिसू लागेल. काशी आणि पंढरपूर यांच्यातील फरक मग केवळ मंदिरांच्या स्थापत्यात राहील; त्यांच्या आत्म्यात नाही. पंढरपूरला हा धोका टाळायचा असेल, तर त्याने इतरांकडून प्रेरणा घ्यावी; पण त्यांची प्रतिकृती होण्याचा प्रयत्न करू नये. काशीचा आत्मा वेगळा आहे. उज्जैनची परंपरा वेगळी आहे. अयोध्येचा इतिहास वेगळा आहे. पंढरपूरची ओळखही पूर्णपणे वेगळी आहे. ही ओळख संतपरंपरेची आहे. वारीची आहे. समतेची आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या संस्कृतीची आहे. म्हणूनच पंढरपूरचा कॉरिडॉरही या ओळखीचे प्रतिबिंब असला पाहिजे. यासाठी देशात आणि महाराष्ट्रात काही अनुकरणीय उदाहरणे आपल्या समोर आहेत.

दिल्लीतील अक्षरधाम मंदिर हे त्यापैकी सर्वांत उल्लेखनीय उदाहरण आहे. तेथे जाणारा पर्यटक किंवा भक्त केवळ मंदिराचे दर्शन घेऊन परत येत नाही. संपूर्ण संकुलाची रचना अशी आहे की, भारतीय संस्कृती, अध्यात्म, इतिहास, मूल्यव्यवस्था आणि आधुनिक सादरीकरण यांचा अनुभव त्याला एकाच ठिकाणी मिळतो. प्रदर्शन दालने, जलप्रदर्शन, चित्रमय मांडणी, प्रेरणादायी प्रसंग, विशाल उद्याने, शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रत्येक घटकातून दिला जाणारा मूल्यांचा संदेश हे त्या संकल्पनेचे वैशिष्ट्य आहे. तेथे आधुनिक तंत्रज्ञान अध्यात्माला झाकोळत नाही; उलट ते अध्यात्माचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचे माध्यम बनते. यातून पंढरपूरला एक महत्त्वाचा धडा मिळतो— अनुभव हा पायाभूत सुविधांपेक्षा मोठा असतो.

उज्जैनचा महाकाल लोक याकडे पाहिले, तर तेथे क्षिप्रा नदी, शिल्पकला, पुराणपरंपरा आणि मंदिर परिसर यांचा एकात्म विचार करण्यात आला आहे. दर्शनाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरण निर्माण करतो. भाविक तेथून केवळ फोटो घेऊन परतत नाही; तर स्मरणात राहील असा अनुभव घेऊन परततो. पंढरपूरमध्ये ही संकल्पना आणखी समृद्ध होऊ शकते. कारण, येथे फक्त मंदिर नाही, तर आठशे वर्षांहून अधिक काळ अखंड चालत आलेली वारी आहे. अभंग आहेत. कीर्तन परंपरा आहे. दिंडी आहे. टाळ-मृदंगाचा नाद आहे. समाजसुधारणेचा इतिहास आहे. जातिभेदावर मात करणारी समतेची चळवळ आहे. भारतात अशी परंपरा दुसरीकडे क्वचितच आढळते. त्यामुळे पंढरपूरचा कॉरिडॉर हा संतविचारांचे जिवंत विद्यापीठ बनण्याची क्षमता बाळगून आहे. मात्र, माझ्या मते पंढरपूरसाठी सर्वांत जवळचे आणि सर्वाधिक अभ्यासण्यासारखे उदाहरण महाराष्ट्रातच आहे- शेगाव. श्री गजानन महाराज संस्थानने गेल्या अनेक दशकांत जे व्यवस्थापन उभे केले, ते केवळ धार्मिक संस्थेचे यश नाही; तर सेवा-आधारित व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल आहे. स्वच्छता, शिस्त, पारदर्शकता, यात्रेकरूंची काळजी, अन्नछत्र, निवासव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, सेवा आणि स्वयंसेवकांची संस्कृती यांचा तेथे सुंदर संगम दिसतो. सर्वसामान्य भाविक तेथे स्वतःचा सन्मान झाल्याची भावना घेऊन परततो. ही भावना केवळ इमारतींमुळे निर्माण होत नाही; ती संस्कारांमुळे निर्माण होते. पंढरपूरच्या कॉरिडॉरसमोरही हीच संधी आहे. या प्रकल्पात केवळ अभियांत्रिकीचा विचार नको; तर समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, संतसाहित्याचे संशोधक, वास्तुविशारद, पर्यावरणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक अभ्यासक यांचाही सहभाग आवश्यक आहे. कारण, हा रस्ता बांधण्याचा प्रकल्प नाही; तर पुढील शतकभर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर परिणाम करणारा आराखडा आहे.

‘या’ कॉरिडॉरमध्ये नेमके काय असावे?

कॉरिडॉरमध्ये संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, एकनाथ, सावता माळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार अशा संतांच्या विचारांवर आधारित डिजिटल संतसंग्रहालय असावे. अभंगांचा इतिहास आणि त्यामागील जीवनदृष्टी अनुभवता येईल अशी अभंग ऑडिओ गॅलरी असावी. वारकरी संप्रदायाची आठशे वर्षांची परंपरा सांगणारे वारी अनुभवकेंद्र असावे. युवकांसाठी संतसाहित्य संशोधन वाचनालय आणि आधुनिक संदर्भात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध यांचा अभ्यास करणारे संशोधन केंद्र असावे. नियमित कीर्तन, प्रवचन, संवाद, चिंतन आणि सामूहिक वाचनासाठी कीर्तन चौक आणि ध्यानकेंद्र असावे. प्लास्टिकमुक्त वारी, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सेवा-संस्कार शिकवणारे कायमस्वरूपी उपक्रम असावेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविक या परिसरातून बाहेर पडताना त्याला एखादा अभंग, एखादा विचार, एखादी प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी मिळाली पाहिजे. हे घडले, तर कॉरिडॉरचे उद्दिष्ट पूर्ण झाले, असे म्हणता येईल.

या संदर्भात आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. इतिहासातील मोठी कामे केवळ निधीमुळे यशस्वी झालेली नाहीत; ती दूरदृष्टीमुळे यशस्वी झाली आहेत. पैसा रस्ते उभारू शकतो; पण संस्कृती घडवू शकत नाही. संस्कृती घडवण्यासाठी विचार, तपश्चर्या, संशोधन आणि निःस्वार्थी नेतृत्व आवश्यक असते. म्हणूनच पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा अंतिम करताना प्रसिद्धीपासून दूर राहून अनेक वर्षे समाजसेवा, अध्यात्म आणि संतवाङ्‌मयाचा अभ्यास करणाऱ्या आधुनिक काळातील संत, वारकरी परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक आणि सेवाव्रती संस्थांचे मार्गदर्शन घेणेही तितकेच आवश्यक आहे. हा प्रकल्प केवळ प्रशासकीय कागदपत्रांवर पूर्ण होणार नाही; तो समाजाच्या सहभागातूनच पूर्णत्वाला जाईल.

आज महाराष्ट्र एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे. हजारो कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील अनेक दशकांसाठी पंढरपूरची ओळख ठरवणार आहे. त्यामुळे आज घेतलेले निर्णय पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहतील. जर या कॉरिडॉरमधून केवळ रस्ते तयार झाले, तर काही वर्षांनी ते जुने होतील. जर केवळ इमारती उभ्या राहिल्या, तर त्यांच्याही मर्यादा असतील. पण जर या कॉरिडॉरमधून संत ज्ञानेश्वरांची विश्वमानवाची दृष्टी, तुकारामांचा करुणेचा संदेश, नामदेवांची भक्ती, चोखामेळ्यांची समता, जनाबाईंची श्रमप्रतिष्ठा आणि वारकरी परंपरेचा सेवाभाव पुढील पिढ्यांच्या मनात रुजला, तर हा प्रकल्प शतकानुशतके जिवंत राहील. पंढरपूरला केवळ आधुनिक तीर्थक्षेत्र बनण्याची संधी नाही; तर जगाला सांगण्याची संधी आहे की, अध्यात्म म्हणजे भूतकाळात अडकून राहणे नव्हे, तर आधुनिक समाजाला मूल्याधिष्ठित भविष्याची दिशा देणे होय. म्हणूनच पंढरपूर कॉरिडॉरचा अंतिम आराखडा सिमेंट, स्टील आणि दगडांचा नसावा; तो संतविचार, समता, सेवा, संस्कार आणि आशा यांचा असावा. तेव्हाच या हजारो कोटींच्या विकासकामाला खऱ्या अर्थाने ‘पंढरीचा आत्मा’ लाभेल.

रामकृष्ण हरी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT