सोलापूर : सोलापूर शहरात अजिंक्यतारा किल्ला, जल मंदिर राजवाडा, चार भिंती, बदामी आदी ऐतिहासिक वास्तू असल्याचा हास्यास्पद उल्लेख महापालिकेने शहराचा २० वर्षांसाठी तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये नमूद केला आहे. साताऱ्यातील ऐतिहासिक वास्तू सोलापुरात असल्याचे दाखवून सोलापूरचा इतिहासच आयुक्तांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाला आहे. प्रारूप विकास आराखड्यातील या प्रकाराने महापालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा हा भूखंड माफियांना अभय देणारा असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. शहराचे १६ भाग करून हा आराखडा तयार केला गेला आहे. शहराचा पुढील २० वर्षांचा आराखडा तयार करताना अनेक बाबींचा समावेश करावा लागतो. त्यात प्रामुख्याने लोकसंख्या, शहरातील क्षेत्रफळ, शहरातील ऐतिहासिक वास्तू, शासकीय व निमशासकीय आस्थापना, हरितक्षेत्र, रहिवासी क्षेत्र, शहरातील पर्जन्यमान, शहरातील हवेची गुणवत्ता, औद्योगिक क्षेत्र, उद्यान, क्रिडांगण अशा साधारण १२५ प्रकारच्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांची नोंद करावी लागते. या बाबी नोंदविताना सध्याची स्थिती आणि भविष्यातील गरज, यांची सांगड घालून त्या-त्या विभागात गरजेनुसार विविध जागांवर विविध प्रकारचे आरक्षण टाकले जाते.
महापालिकेने देखील १ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात अशा अनेक आवश्यक बाबींचा समावेश करीत ४८० पानांचा विकास आराखडा आयुक्त शीतल तेली उगले आणि उपसंचालक नगररचना मनिष भिष्णूरकर यांच्या स्वाक्षरीने महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. पण, त्यातील २३९ क्रमांकाच्या पानावर सोलापूरमधील ऐतिहासिक स्थळांची माहिती देताना सोलापूर शहरात अजिंक्यतारा किल्ला, जल मंदिर राजवाडा, चार भिंती, बदामी आदी ऐतिहासिक वास्तू असल्याचे दाखविण्यात आले आहे. वास्तविक पाहता ही सर्व ऐतिहासिक स्थळे साताऱ्यातील आहेत. या हास्यास्पद प्रकाराने महापालिकेत सुरू असलेला अनागोंदी कारभार खुद्द प्रशासनानेच चव्हाट्यावर आणला आहे.
नेमके काय घडले याची माहिती घ्यावी लागेल
महापालिकेच्या प्रारूप आराखड्यात काही ऐतिहासिक वास्तूंची नावे चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झाल्याचा विषय माझ्या कानावर आला आहे. पण, नेमके काय घडले आहे याबाबत सविस्तर माहिती घेतो.
- मनिष भिष्णूरकर, उपसंचालक ( नगररचना), महापालिका, सोलापूर
बदललेल्या विकास आराखड्याला आमचा विरोध कायम
शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी मक्ता देण्यात आला होता. संबंधित मक्तेदारांनी ४८० पानांचा काय आराखडा तयार केला आहे. हा आराखडा एक तर महापालिका आयुक्तांनी पाहिलेच नाहीत. नाही तर महापालिका आयुक्तांना सोलापूरचा इतिहास माहिती नसावा, हे या प्रकारावरून दिसून येते. महापालिका प्रशासनाला आराखड्याचे किती गांभीर्य होते, हे देखील स्पष्ट होते. त्यामुळे या विकास आराखड्याला आमचा विरोध कायम राहणार आहे.
- शैलेश आमणगी, कार्यकारी सदस्य, कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.