तात्या लांडगे
सोलापूर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदल झाला असून ‘बालभारती’ने पहिल्या वर्गासाठी ४७ लाख पुस्तकांची छपाई केली आहे. त्रिभाषा सूत्रानुसार सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यात आली. पण, महाराष्ट्रातील गुजराती, सिंधी, तेलुगू, तमीळ, उर्दू भाषिक पहिलीतील विद्यार्थ्यांना मराठी सहजपणे समजावी म्हणून स्वतंत्रपणे सोप्या शब्दांतील मराठीच्या पुस्तकांची ‘बालभारती’कडून छपाई सुरू केली आहे. मराठीबद्दलची गोडी वाढावी हा त्यामागील हेतू आहे.
यंदा पहिलीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानाशिवाय असतील. इयत्ता पहिली ते आठवीची सर्व नियमित पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी खेळू-करू-शिकू या पाठ्यपुस्तकाऐवजी शिक्षक हस्तपुस्तिकेची निर्मिती करण्यात येत आहे. मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘खेल खेल मे सिखे हिंदी’ असे पाठ्यपुस्तक असेल. मराठीशिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमधील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ असे मराठीचे पुस्तक असणार आहे. मुलांना भाषेची आवड निर्माण व्हावी, दिसायला आकर्षक दिसावी, त्यातून त्यांची वाचन व आकलन क्षमता वाढेल, अशी रचना पाठ्यपुस्तकांची असल्याचेही ‘बालभारती’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुस्तकांची छपाई पूर्ण, आता...
‘बालभारती’कडून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची छपाई करून तालुक्याच्या गोदामांमध्ये पुस्तके पोचवली आहेत. आता मराठीशिवाय अन्य भाषिक विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेतून मराठीचे पुस्तक छपाई सुरू आहे. हिंदी भाषेच्या पर्यायी भाषा तथा विषयाबद्दल बालभारतीने मार्गदर्शन मागविले आहे. ‘एसईआरटी’च्या मार्गदर्शनानुसार पुस्तक छपाईची पुढील कार्यवाही होईल.
- कृष्णकुमार पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे
दुसरी ते बारावीचाही बदलणार अभ्यासक्रम
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम तथा पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार छपाई करण्यात आली आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या वर्गाचा, २०२७-२८ साली पाचवी, सातवी, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. तर २०२८-२९ या शैक्षणिक वर्षात महत्त्वाच्या आठवी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार आहे.
शिक्षकांचे १५ जूनपर्यंत प्रशिक्षण
राज्यात शाळा १६ जूनपासून सुरू होणार असून तत्पूर्वी १५ जूनपर्यंत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण पार पडणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवसांचा असून प्रशिक्षणासाठी दिलेल्या विषयानुसार एक तासिका ९० मिनिटांची अशा दररोज चार तासिका होणार आहेत. दुसरीकडे अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांसाठी देखील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अध्यापन होणार असून त्यासाठी अंगणवाडी सेविकांचेही सहा महिने ते एक वर्षाचे प्रशिक्षण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.