Tukaram Mundhe
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरात मावा विकणारे दररोज अंदाजे ३० ते ४० लाख रुपये कमावतात. तुकडा सुपारीत तंबाखू, कात, चुना टाकून मावा बनवितात. काहीजण त्यात गांजाचे पाणी देखील टाकतात, असे बोलले जाते. जीवितास धोकादायक असलेल्या मावा व गुटखा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बहुतेक पानटपऱ्या कुलूपबंद दिसत आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पानटपरी चालकांना १२ जुलै २०१२ रोजी झालेल्या गुटखाबंदीची आठवण झाली. तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी देखील आता कारवाईसाठी फिरताना दिसत आहेत. आयुक्त मुंढे यांनी लोकांच्या जीवितास धोका होईल, असे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर, भेसळ करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच मावा, गुटखा विक्रेत्यांवर भारतीय न्याय संहितेतील कलम १२३ नुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यात दोषींना दहा वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाचीही तरतूद आहे. याची धास्ती पानटपरी चालकांनी घेतली आहे. चौकाचौकांत बिनधास्तपणे मावा चोळणाऱ्या, गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्यांना आता कुलूप दिसत आहे.
टपरी बंद, आडोशाला मावा विक्री
अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरात फिरत आहेत, काही पानटपरी चालकांवर त्यांनी कारवाई केली आहे, अशी माहिती खबऱ्यांमार्फत प्रत्येक पानटपरी चालकापर्यंत पोचते. त्यानंतर अनेकजण पानटपरीस कुलूप लावून जवळच कोठेतरी आडोशाला मावा, गुटखा विकतात, असे चित्र पाहायला मिळत आहे.
तुकाराम मुंढे साहेबांमुळे टपरी चालकांना धास्ती
कायद्याने प्रतिबंधित केलेले पदार्थ (गुटखा, मावा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ) विकणाऱ्यांवर सध्या जोरात कारवाई सुरू आहे. आमच्या विभागाची पथके सतत फिल्डवर असून, दररोज त्यांच्याकडून मावा, गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून खूपच सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. सध्या मावा, गुटखा विकणाऱ्या अनेक पानटपऱ्या बंद झाल्या आहेत.
- साहेबराव देसाई, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.