Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

घोंघावणाऱ्या वादळाचा उगम

शिवसेना आणि काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागला

शीतल पवार

विधानपरिषदेचा निकाल समोर आला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस वगळता शिवसेना आणि काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागला. पुरेसे संख्याबळ नसूनही भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यात यश आलं. विशेष म्हणजे भाजपला पहिल्या पसंतीची १३३ मते मिळाली. इथेच महाविकास आघाडी अस्थिर असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.

दिल्लीत काँग्रेस आणि राज्यात उद्धव ठाकरे यांनी काही हालचाली करण्याआधीच राज्यातील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ होत सुरतेला पोहचले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची चर्चा समोर यायला लागली. यामुळे महाविकास आघाडीच्या आधी शिवसेनेच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

शिवसेनेचे जेष्ठ नेते, ठाण्यातले सेनेचे पॉवरफुल आमदार असलेले शिंदे सध्याच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. ठाणे जिल्ह्यांव्यतिरिक्त कोकण, पश्चिम महाराष्ट्रातही शिंदेंचा प्रभाव राहिलाय. ठाण्यात त्यांचा राजकारणाचे गुरु धर्मवीर आनंद दिघे होते. नुकताच त्यावर सिनेमाही प्रदर्शित झाला. ठाण्यातल्या शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीत प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला तर त्यांच्या राजकीय अजेंड्यावर राहिलं ''हिंदुत्व''.

महाविकास आघाडी झाली आणि गणितं बदलली !

नाराजीचं हे नाट्य आज अचानक घडलेलं नाही. महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी सत्तेची जुळवाजुळव सुरु असल्यापासून शिवसेनेत बंडखोरीची ठिणगी पडली होती. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करू नये अशी एका गटाची मागणी होती. या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज प्रेस कॉन्फरन्समधून दुजोरा दिलाय. पुढे मविआ स्थापनेत मुख्यमंत्री पदावरून तिन्ही पक्षात चर्चा सूर असतांना ‘ठाकरेच मुख्यमंत्री’ अशी घोषणा थेट शरद पवारांनी केल्यावर मात्र शिंदेंनी तलवार म्यान केली; पण नाराजी मात्र कायम राहिली.

शिवसेनेतली नाराजी

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले. त्यापैकी मुंबई-ठाणे-रायगड या विभागातून सर्वाधिक १९, मराठवाड्यातून १५ आणि त्याखालोखाल कोकणमधून ८, पश्चिम महाराष्ट्रातून ७, उत्तर महाराष्ट्रातून ६ आणि विदर्भातून १ उमेदवार निवडून आला. विदर्भात शिवसेनेने फारसे लक्ष सत्तेत आल्यानंतरही दिलेलं नाही. गेले दोन वर्ष शिवसेनेचे ठराविक नेते नाराज आहेत, अशी माहिती सातत्याने समोर येत राहिली. त्यापैकी १७ नेत्यांनी गेल्या वर्षभरात सार्वजनिक आणि खासगीरित्या बोलताना पक्ष आणि महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्या नेत्यांचे वर्चस्व प्रामुख्याने मुंबई आणि कोकण पट्ट्यात आहे. त्याखालोखाल मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ठराविक नेते नाराज आहेत.

शिवसेनेतल्या नेत्यांच्या नाराजीची प्रमुख कारणे अशी राहिली

  • महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा आणि नेत्यांचा प्रभाव विभागला

  • सत्तेत अपेक्षित पद मिळाले नाही

  • पक्षांतर्गत प्रभाव घटला

  • पक्षांतर्गत संवादाचा अभाव

  • स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्व

शिवसेनेतील अंतर्गत सत्ताबदल

बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा सांभाळली. उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत गेल्या दोन दशकांत विकसित झालेले नेतृत्व आज वयाच्या साठीच्या पुढे (उदा. एकनाथ शिंदे, दिवाकर रावते इत्यादी) आहे. मुख्यमंत्रीपदामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्षसंघटनेसोबतचा संवाद कमी घटत गेल्याचे दिसते आहे. त्याचबरोबर पक्षसंघटना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालविण्याचे उद्धव ठाकरे यांचे नियोजन स्पष्ट झाले आहे. राज्यातील सत्तेचा पक्षसंघटनेसाठी वापर करण्याइतका आदित्य ठाकरे यांचा आवाका जाणवलेला नाही. परिणामी, सध्या साठीच्या घरात असलेले नेते कमालीचे अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट होत चालला आहे.

या सगळ्यांतून शिवसेनेमध्ये चार गट प्रामुख्याने आकाराला आल्याचे दिसत आहेत. ते असे

  • मूळ शिवसैनिक (वय वर्षे ७० ते ८०: उदा. सुभाष देसाई)

  • उद्धव ठाकरेंसोबत विकसित झालेले नेतृत्व (वय वर्षे ५० ते ७०: उदा. मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे)

  • आदित्य ठाकरेंसोबत विकसित होऊ पाहणारे नेतृत्व (वय वर्षे ३० ते ४०: युवासेना, सत्तेत विशेष पदे नसलेले)

  • सत्तेसोबत विकसित होत असलेले नेतृत्व (वय वर्षे ५० ते ६०: उदा. संजय राऊत, अनिल परब, तानाजी सावंत)

हिंदुत्व

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ते आदित्य ठाकरे - हे पक्षातील सत्तांतर होताना शिवसेनेच्या प्राधान्यक्रमात हिंदुत्वाचा मुद्दा गौण होतोय, अशी पक्षातील जेष्ठ नेत्यांची भावना आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःच्या गटाची बांधणी करीत आहेत. त्यांना मूळ शिवसैनिक आणि सत्तेसोबत विकसित होत असलेल्या नेतृत्व गटांचा पाठिंबा राहिलाय. याउलट उद्धव ठाकरेंसोबत विकसित झालेले नेतृत्व सध्याच्या बदलांमध्ये कमालीचे अस्वस्थ आहे. कारण याच गटाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे आव्हान सर्व निवडणुकांमध्ये पेलायचे आहे.

निवडणुकीच्या राजकारणात शिवसेनेतील उद्धव ठाकरेंसोबत विकसित झालेल्या नेतृत्व गटाचे वर्चस्व आजही कायम आहे. त्यांच्यातील अनेकांचे करियर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला विरोध करून तयार झालंय. महाराष्ट्रात एकूण ४८ विधानसभा मतदारसंघ (सुमारे १७%) असे आहेत जिथे थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढत होते. तसेच २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची मते राज्यातील २७ विधानसभा मतदारसंघांत आहेत आणि तेथेही शिवसेनेला प्रामुख्याने ‘राष्ट्रवादी’शीच लढावे लागणार आहे. त्यामुळे, आजचे एकनाथ शिंदे यांचे बंड केवळ तात्कालिन सत्तेसाठी आहे, असे मानता येणार नाही. शिवसेनेच्या एकूण भविष्याला दिशा देणारे हे बंड ठरणार आहे.

- shital.pawar@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT