सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७७ शाळांमध्ये सध्या शिक्षकांची ७०० पदे रिक्त आहेत. सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीत तेवढीच पदे भरली जातील, अशी आशा होती. मात्र, पटसंख्येअभावी नवीन संचमान्येच्या निकषांनुसार तेवढीच पदे अतिरिक्त होणार असल्याने शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही नवा शिक्षक मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशीच स्थिती राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमधील आहे.
सोलापूर जिल्ह्यात नव्याने वाढणाऱ्या एलकेजी, यूकेजी व पहिली ते चौथीपर्यंतच्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांची संख्या ४०० हून अधिक आहे. २०२४-२५ या एका वर्षात जिल्ह्यात सुमारे ५० इंग्रजी शाळा वाढल्या आहेत. याशिवाय ‘सीबीएससीई’सह अन्य बोर्डाच्या इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्याही शाळांची संख्या ६० पेक्षा जास्त आहे. शहराबरोबरच गावागावांतील पालकांचा कल आता बदलल्याने मराठी शाळा विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पट झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात सुमारे चार हजारांनी कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नव्या संचमान्यतेच्या निकषांत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या सध्याच्या रिक्त पदांएवढीच असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
जेवढी पदे रिक्त, तेवढीच अतिरिक्त होण्याची शक्यता
३१ ऑगस्ट २०२४ च्या स्थितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रोस्टर तपासणी होईल. त्रुटींची पूर्तता करून रोस्टर पुण्याला पडताळणीसाठी पाठविले आहे. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे ७०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पण, नवीन संचमान्यतेतील निकषांनुसार जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येअभावी पदे कमी होतील, असा अंदाज आहे.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
स्पर्धा वाढतेय, तरी नाहीत शाळांच्या भेटी
जिल्हा परिषदेच्या शाळांचा विस्तार मोठा असल्याने विद्यार्थी गुणवत्तेच्या अनुषंगाने केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांना सतत भेटी देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या विस्ताराधिकाऱ्यांची ६४ पैकी ५२ पदे रिक्त आहेत तर केंद्रप्रमुखांची १९९ पैकी ६३ पदेच भरलेली आहेत. याशिवाय ११ गटशिक्षणाधिकाऱ्यांपैकी मोहोळ वगळता अन्य कोणत्याही तालुक्यासाठी गटशिक्षणाधिकारी नाहीत, अशी स्थिती आहे.
सोलापूर जिल्हा परिषद शाळांची स्थिती
एकूण शाळा
२,७७७
प्रवेशित विद्यार्थी
१.९४ लाख
मंजूर शिक्षक
९,८००
शिक्षकांची रिक्त पदे
७००
पटसंख्येअभावी अतिरिक्त शिक्षक
सुमारे ७००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.