तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी १०० पेक्षा जास्त जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वाहतूक पोलिस चौकाचौकात दंडात्मक कारवाई करतात. तरीदेखील, दुचाकीस्वार, रिक्षाचालक, चारचाकी चालक वाहतूक नियम पाळत नाहीत, असे चित्र वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. २०२५ या वर्षात सोलापूर वाहतूक पोलिसांनी तब्बल दोन लाख ३९ हजार ४१६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत या वाहनचालकांना तब्बल २२ कोटी ८१ लाख रुपयांचा दंड झाला आहे.
अपघातावरील नियंत्रणासाठी वाहतूक नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. ज्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली, त्यांनी एकूण ७५ दिवसांत दंड भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. वाहनावर दंड असल्यास आरटीओकडून त्या वाहनास फिटनेस प्रमाणपत्र मिळणार नाही. वाहनाचे हस्तांतर, विक्रीदेखील करता येणार नाही. दरम्यान, दंडात्मक कारवाई झालेल्यांमध्ये ट्रिपलसीट दुचाकीस्वार, मॉडीफाय सायलेन्सर लावणारे बुलेटस्वार, फॅन्सी नंबरप्लेटची वाहने व मोबाईलवर बोलणारे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आहेत.
पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर खिरडकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे, सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अंमलदारांनी ही कारवाई केली आहे. अपघात नियंत्रणात यावेत व रस्ते अपघातात कोणाला जीव गमवावा लागू नये, या हेतूने वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
२०२५ वर्षातील कारवाई
मॉडीफाय सायलेन्सर केसेस
४०४५
एकूण दंड
४०.८६ लाख
ट्रिपलसीट कारवाई
२३,२२३
एकूण दंड
२,३२,२३,०००
फॅन्सी नंबरप्लेट
१४,१५६
एकूण दंड
१,०३,३०,५००
मोबाईल टॉकिंग
२०,७७७
एकूण दंड
२,९४,५२,०००
वाहनचालकांना वाहतूक नियम पाळावेच लागतील
सोलापूर शहरात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. वाहतूक पोलिस नेहमीच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करतात. तरीदेखील, वाहनधारक विशेषत: दुचाकीस्वार, रिक्षाचालक वाहतूक नियम पाळत नाहीत. २०२५ मध्ये सुमारे अडीच लाख बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ऑनलाइन दंड आहे, भरला नाही तरी चालतो हा भ्रम बेशिस्त वाहनचालकांनी बाळगू नये. नव्या नियमांनुसार त्यांना दंड भरल्याशिवाय गाडी विकता येणार नाही, गाडीसंबंधी कोणताही व्यवहार किंवा आरटीओ कार्यालयाकडील काम करता येणार नाही.
- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.