solapur city bus
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘पीएम ई- बस’ योजनेतून सोलापूर महापालिकेला १०० बसगाड्या मिळणार असून सध्या २० बस मिळाल्या आहेत. यातील ११ बस दाखल झाल्या असून ‘आरटीओ’कडून पासिंग झाल्यावर त्या प्रवाशांना सेवा देतील. पहिल्या टप्प्यासाठी १० रुपये आणि दूरवरील अंतरासाठी ५५ ते ६५ रुपये तिकीटदर असणार आहे. या इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून सोलापूरकरांना दर्जेदार व पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी चार स्वीपींग मशीनचेही लोकार्पण पार पडले. दरम्यान, विमानसेवेपासून चाळीतील रहिवाशांचा ‘बी-टू’चा प्रश्न मार्गी लागला. आता शहरातील उड्डाणपुलांचाही प्रश्न काही दिवसांत मार्गी लागेल. सोलापूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी दिली. १५ सप्टेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यात २० बस दाखल होतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ८० बस मिळतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
‘या’ मार्गांवर धावणार ई-बस
सोलापूर शहरातील राजस्वनगर, नई जिंदगी, कन्ना चौक, राजेंद्र चौक, बाजार समिती, जुना विडी घरकूल, ज्ञानेश्वरनगर, साखर कारखाना, देसाईनगर, रे-नगर, सैफूल, आसरा चौक, सोरेगाव या मार्गांवर बस धावतील. याशिवाय ग्रामीणमधील पानमंगरूळ, मंद्रुप, विंचूर, औराद, मोहोळ, कासेगाव, बोरामणी, चपळगाव, मुस्ती, हत्तरसंग कुडल, मार्डी, वडगाव, वडाळा या मार्गावरही इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
थांब्यावर असणार आरटीओ, वाहतूक पोलिस
शहरातील परिवहनच्या बसचे थांबे ज्याठिकाणी आहेत, तेथे यापुढे रिक्षा थांबू नयेत यासाठी आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेला महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. सध्या महापालिकेच्या बस थांबतात तेथे रिक्षांचा गराडा पडलेला दिसतो. दररोज एक बस किमान १८० किलोमीटर धावेल, यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. बसचे वाहक महापालिकेतर्फे नेमलेले असतील, चालक मात्र ‘जेबीएम’ कंपनीचे असणार आहेत.
नवीन ई-बसची वैशिष्ट्ये...
नवीन ई-बसमध्ये महिलांसाठी चार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी प्रत्येकी चार सीट आरक्षित असणार आहेत.
बसमध्ये २५ प्रवाशांची आसन व्यवस्था आहे; महापालिका शाळांमधील मुलींना मोफत प्रवास, विद्यार्थी, नागरिक, कंपनी कर्मचाऱ्यांसाठी मासिक पासची सोय.
शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक पासमध्ये ५० टक्के, १२ वर्षांखालील मुलांना ७५ टक्के, कंपनी व नागरिकांना मासिक पासमध्ये २५ टक्के सवलत.
एका बसमध्ये पाच सीसीटीव्ही कॅमेरे, सेंसरद्वारे उघडणार दरवाजा, बंदही आपोआप होणार दरवाजा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.