सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून जागा दिल्या. निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहर उत्तरमधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. या मतदारसंघातील दोन मतदान केंद्रातील दोन मशिनची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पडताळणीसाठी लागणारे ९४ हजार ४०० रुपयांचे चलनही त्यांनी आज भरले आहे. जिल्ह्यातील ११ मतदारसंघापैकी फक्त कोठे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सात दिवसांच्या आत (निकालाचा दिवस धरून) प्रशासनाकडे रीतसर अर्ज व चलन भरणे आवश्यक होते. अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातून कोठे यांचा एकमेव अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. कोठे यांनी दोन मतदान केंद्रातील ईव्हीएमची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी दोन मशिनच्या पडताळणीसाठीचे चलन (एका मशिनचे ४० हजार व १८ टक्के जीएसटी) जिल्हा कोशागार कार्यालयात जमा केले आहे.
आज दाखल झालेल्या अर्जावर ४५ दिवसानंतर कार्यवाही केली जाणार आहे. ४५ दिवसांचा कालावधी हा निवडणूक याचिका दाखल करण्यासाठीचा अपील कालावधी आहे. या कालावधीत जर याचिका दाखल झाली तर न्यायालयाच्या आदेशानंतर ईव्हीएमची पडताळणी होणार आहे. निवडणूक याचिका दाखल न झाल्यास ४५ दिवसानंतर ईव्हीएम उत्पादक कंपनीच्या अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून त्या दोन मशिनचे मॉकपोल केले जाणार आहे. मतदारांनी टाकलेले मतदान हे कोठे यांनाच मिळाले आहे का?, याची खातरजमा करून दिली जाणार आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आलेल्या मशिन योग्य होत्या की नाही? याचीही खातरजमा यातून केली जाणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना १ लाख १७ हजार २१५ एवढी मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोठे यांना ६२ हजार ६३२ एवढी मते मिळाली आहेत.
अनेकांनी केली नुसतीच चौकशी
निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर आरोप करण्यास सुरवात केली. राज्यस्तरावरील नेते ईव्हीएमवर आरोप करत असताना सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली. यासाठी आवश्यक असलेले चलन, चलन भरल्यानंतर राबविली जाणारी प्रक्रिया पाहता, अनेकांनी यातून काढता पाय घेतल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.